Buldhana News – निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर कृषी विभागाची करावाई; पाच कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खरीप हंगामात सोयाबीनची उगवण न झाल्याने हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना कृषी विभागाने निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांवर मोठी कारवाई केली आहे. अकोला येथील प्रयोगशाळेच्या अहवालात बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत पाच बियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यंदा जिल्ह्यातील अनेक भागांत सोयाबीनची उगवण अत्यल्प झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार विविध ठिकाणांहून बियाण्यांचे नमुने संकलित करून ते अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. तपासणी अहवालात संबंधित बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर विभागाने कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला.

कृषी विभागाच्या तक्रारीवरून रवी सीड्स, बूस्टर सीड्स, ईगल सीड्स, पार्श जेनेटिक्स आणि यशोदा सीड्स या पाच कंपन्यांविरुद्ध संबंधित कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, इतर कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणखी काही कंपन्यांविरोधातही गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी दिली. निकृष्ट बियाण्यांबाबत कृषी विभागाने कठोर भूमिका घेतल्याने दोषी कंपन्यांवरील कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, प्रयोगशाळा अहवालांकडे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.