
“लोकशाहीमध्ये संवाद आवश्यक असतो. त्यामुळे स्वत:ची ‘मन की बात’ जबरदस्तीने सगळ्यांना ऐकवणारे, ‘जन की बात’ ऐकत नसतील तर ही लोकशाही नाही, तर हुकुमशाही आहे”, असा जोरदार हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला असून उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जंतरमंतर येथे जाऊन कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह विद्यार्थ्यांची भेट घेतली. यानंतर बुधवारी सकाळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पत्रकार घेत उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांवर निर्दयपणे लाठीचार्ज करणाऱ्या मोदी सरकारवर आसूड ओढला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “मी पहिल्या दिवसापासून या तरुणांना समर्थन दिले आहे. तरुण हे आपल्या देशाचे भविष्य आहेत, भाग्यविधाते आहेत. भाग्यविधात्यांचे भाग्यच जर तुम्ही चिरडून टाकणार असाल तर ती लोकं तुमचं काही ऐकणार नाहीत. ज्यावेळी अशा तरुणांची तुम्ही झुरळ म्हणून निर्भत्सना करता, तेव्हा तर हे सहनशीलतेच्या पलिकडे आहे. विद्यार्थी राजीनामा मागत असतील तर त्यात चूक काय? हा त्यांच्या भविष्याचा विषय आहे. एक व्यक्ती किंवा संपूर्ण देशाचे भविष्य यातून तुम्हाला निवडायचे आहे.”
“या मुलांना कुणी तरी आधार देण्याची गरज आहे. आज त्यांना जर आधार दिला, तर हे देशाचे भावी आधारस्तंभ देश वाचवू शकतील. पण आजच या आधारस्तंभाला तोडून मोडून टाकून हुकुमशाही लादणार असाल तर ही मुलं गप्प बसणार नाहीत. आपण लोकशाही मानतो. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीपैकी एक आहोत असे मानत असू तर तुम्हाला त्यांच्यासोबत जाऊन बोलण्यात कमीपणा कसला वाटतोय?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 20-25 वा दिवस आहे. त्याआधी 10-15 दिवस अभिजीत दिपके आणि सगळी तरुण मंडळी इकडे येऊन गेली होती. त्यावेळी चर्चा केली असती तर हा विषय सुटला असता, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
ज्या तऱ्हेने सत्ताधारी वागताहेत, ते पाहून सत्ताधाऱ्यांचा डाव देशात अराजकता माजवण्याचा आहे का? आंदोलनात पाकिस्तानी घुसले असे म्हणत एक बदनामीचा हातखंडा सत्ताधाऱ्यांचा आहे, तर सत्ताधाऱ्यांमध्येही कुणी पाकिस्तानी नाही ना? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. मे महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रेय होसबाळे यांनी एक विधान केले होते. पाकिस्तानसोबत चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत, असे ते म्हणाले होते. पाकिस्तान बरोबर चर्चेचे दरवाजे उघडे ठेवा म्हणता, मग जे विद्यार्थी देशाचे भाग्यविधाते आहेत त्यांच्याबरोबर बोलण्यात कमीपणा का वाटतोय? मला हे गणित कळत नाही. जे तुमच्या दारात आले आहेत. तुमच्याकडून अपेक्षा बाळगून आले आहेत, त्यांच्यावर लाठ्या चालवत आहेत. मुलींवर, महिलांवर असभ्यपणे अत्याचार केले गेले आहेत. एका मुलीचे कपडे फाडण्यात आहेत, ही कोती हिंदू संस्कृती आहे? ही रावण संस्कृती आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
चर्चेसाठी तयार असून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही, अशी भाषा सत्ताधाऱ्यांकडून वापरली जात आहे. याचाही उद्धव ठाकरे यांची समाचार घेत, ही मस्ती असून या मस्तीच्या विरोधात सगळा देश पेटला आहे. ही राष्ट्रभावना आहे, असे म्हटले. तसेच लोकांन रस्त्यावर यायचे असून त्यांना व्यक्त व्हायचे आहे. त्यामुळे त्यांना त्याच्यापासून अडवू नये. हा काही अचानक उफाळून आलेला असंतोष नाही. हा गेल्या 12 वर्षांत साठलेला असंतोष असून तो आता उफाळून बाहेर पडतोय, असेही ते म्हणाले.
काल आदित्यने पत्रकार परिषद घेतली आणि युवासेनेतर्फे एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे. जवळपास 300 हून जास्त आंदोलकांना मुंबईत डिटेन करून ठेवण्यात आले होते. यापैकी बऱ्याच लोकांना युवासेनेने सोडवले. पोलिसांनी त्यांचे नाव, पत्ते घेतले आणि अर्ध्या रात्री त्यांना डिजिटल नोटीस पाठली. डिजिटल अरेस्ट बेकायदेशीर असेल, तर डिजिटल नोटीसही बेकायदेशीर मानली पाहिजे. आणि नोटीस काय पाठवता तुम्ही, ज्याच्यामुळे हा विषय पेटलेला आहे तो तुम्ही सोडवा. म्हणजे या देशामध्ये अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा नाही. आवाज उठवला तर ते तुम्हाला चेपून काढणार. ही लोकशाही देश मानणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच तुझे-माझे करण्यापेक्षा आपले म्हणून या देशाच्या आणि मुलांच्या मागे उभे राहिले पाहिजे. मी या मुलांसोबत आहे. काल अभिजीतची भेट घेतली आणि भाषण करायला नाही, तर वंदन करायला आल्याचे मी त्यांनी म्हटले. कारण असे वाटत होते की राजकारणात आम्ही लढत आहोत. पण कुणासाठी लढतोय? कुणासाठी लढतोय ती मुलं माझ्यासमोर होती. हे बघितल्यानंतर लक्षात येते की, आपल्या देशामध्ये अन्यायविरुद्ध लढण्याची जी चीड, मर्दपणा आहे तो जिवंत आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.



























































