
आपल्या सुमधुर आवाजाने गेली पाच दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघातर्फे देण्यात येणारा ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ‘निर्माता गौरव पुरस्कार’ हेरंब थिएटर्सचे सुशील आंबेकर यांना, तर ४,५०० हून अधिक मराठी वाद्यवृंदांचे प्रयोग साकारणारे निर्माते उदय साटम यांना ‘विशेष कला गौरव पुरस्कार’ देण्यात येणार आहे. तसेच ‘लावणी गौरव पुरस्कारा’ने अभिनेत्री व नृत्यांगना मेघा घाडगे यांचा गौरव करण्यात येणार आहे.
मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघातर्फे आषाढी एकादशीचे औचित्य साधून दरवर्षी ‘पाऊले चालती’ या विठ्ठल भक्तिगीत संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याच कार्यक्रमात ज्येष्ठ कलाकार, गायक, वादक व तंत्रज्ञ यांचा गौरव करण्यात येतो; तसेच जीवनगौरव व विशेष कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यंदा हा सोहळा आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच उद्या, शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता ‘छत्रपती शिवाजी महाराज मंदिर’, दादर (पश्चिम) येथे होणार आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पार्श्वगायक सुदेश भोसले आणि अभिनेत्री नीलम शिर्के उपस्थित राहणार आहेत.
यांचाही होणार गौरव
या पुरस्कार सोहळ्यात वाद्यवृंद व्यवस्थापक हरी पाटणकर, प्रकाशयोजनाकार रोहिदास होडे, ध्वनिसंयोजक नरेश पाटील (त्रिलोक साऊंड), चरित्र कलाकार गणेश टिकम, नृत्यदिग्दर्शक शशिकांत जाधव, तालवादक डॉ. किशोर खुशाले, संगीत संयोजक परेश धामणस्कर, निवेदक परेश दाभोळकर, गायक संतोष कोरगावकर आणि गायिका सपना हेमण यांनाही पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.





























































