आंदोलन चिघळू देऊ नका, परिणाम भयानक होतील! आदित्य ठाकरे यांचा सरकारला गंभीर इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात तरुण रस्त्यावर उतरला आहे. देशहितासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी तरुणाईचा आवाज आता सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यामुळे ‘आंदोलन चिघळू देऊ नका, त्याचे परिणाम भयानक होतील,’ असा गंभीर इशारा बुधवारी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकाला दिला.

शिवसेनेच्या शनिवारच्या शिवतीर्थावरील आंदोलनात संघर्षाची ठिणगी पडल्यानंतर संपूर्ण मुंबईत तरुणाई ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून सरकारच्या हुकूमशाहीचा निषेध करीत आहे. शिवतीर्थावर हे आंदोलन अजूनही सुरूच आहे. अनेक तरुण दररोज शिवतीर्थावर येऊन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत. या तरुणांची आज आदित्य ठाकरे यांनी भेट घेऊन संवाद साधला. मुंबईतील आंदोलनाच्या ठिकाणाहून तरुणांना उचलले जात आहे. घरातून उचलले जात आहे. दिल्लीत पोलिसांनी आंदोलकांवर अमानुषपणे लाठीहल्ला केला. हिंसा सरकारकडून सुरू आहे. शॉक देणारे टेझर, पेलीट गन, टियर गॅस वापरला. अशी ‘लोकशाही’ जगात कुठल्याही देशात नाही. हा प्रकार निषेधार्ह आहे. हा सर्व प्रकार जग पाहतोय. दिल्लीतील प्रकाराविरोधात आंदोलन होऊ द्या. देश एकवटलाय. तरुणाईचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. या वेळी शिवसेना नेते ऍड. अनिल परब, आमदार महेश सावंत, ‘मनसे’ नेते अमित ठाकरे, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, ‘मनसे’चे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.

आंदोलनात तरुण, विद्यार्थी उतरले आहेत. मात्र जे तरुण देशासाठी एकत्र आले आहेत, त्यांना अतिरेकी ठरवले जात आहे. कारण खरे देशद्रोही भाजप सरकार देशात बसलेय, असा टोलाही त्यांनी लगावला. मात्र सरकार जेवढी हिंसक पावले उचलेल तितके आंदोलन चिघळेल. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही, तर आता हकालपट्टीच झाली पाहिजे.

दिल्लीत संसद भवनाकडे जाणाऱ्या तरुणाईची डोकी फोडली जातायत आणि ज्याच्याकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे तेच ‘काय अर्जंन्सी’ आहे, असा सवाल करीत आहेत. आमची केसही चार वर्षे लटकली आहे. पक्ष फोडले जाताहेत. ‘काय अर्जंन्सी आहे!’ लोकशाहीचा बट्टय़ाबोळ झाला आहे.