
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये सातत्याने अस्वच्छता आढळून येत आहे. काही दिवसांपूर्वी ताकात माशी तर कांदा भजीत प्लॅस्टिकचा धागा आढळून आला होता. या घटनांची दखल घेत ‘एफडीए’च्या पथकाने आज कॅन्टीनमध्ये धाड टाकून झाडाझडती घेतली. या प्रकरणी महापालिकेकडूनदेखील कॅन्टीन चालकाला 50 हजार रुपयांचा दंड आकारला आहे.
पालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये अस्वच्छता असते. याबद्दल ग्राहक वरचेवर तक्रार करत असतात. मात्र कॅन्टीन चालकाकडून याची दखल घेतली जात नाही. या प्रकरणी आज ‘एफडीए’च्या पथकाने कॅन्टीनमध्ये धाड टाकली. मात्र एफडीएकडून नेमकी काय कारवाई करण्यात आली याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र ‘एफडीए’च्या पथकातील अधिकारी कॅन्टीनमध्ये पाच तास ठाण मांडून बसल्याचे सांगण्यात येते.



























































