
चेंबूर येथील कलेक्टर कॉलनी महानगरपालिका शाळेच्या बाजूला एका इमारतीचे बांधकाम सुरू असून तिथे उभारण्यात आलेले सुमारे ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळून शाळेच्या आवारात पडले. ही दुर्घटना पहाटे साडेतीनच्या सुमारास घडल्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. बॅरिकेड हटवेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जोरदार पावसात कलेक्टर कॉलनी महानगरपालिका शाळेत मोठी दुर्घटना घडली. शाळेच्या बाजूलाच एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकामाच्या बाजूने ३५ फूट उंच बॅरिकेड उभारण्यात आले आहेत. हे बॅरिकेड बुधवारी वाऱ्यामुळे कोसळले आणि शाळेच्या आवारात पडले. तसेच शाळेसमोरील सुमारे ३० मीटर लांबीच्या संरक्षक भिंतीचा काही भागही कोसळला. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती महापालिकेने दिली.
घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे विभागीय कर्मचारी व विकासकाचे कामगार घटनास्थळी दाखल झाले. या परिसरात धोकादायकचा फलक लावण्यात आला असून, विकासकाच्या प्रकल्प अभियंत्यांना असुरक्षित बॅरिकेड तातडीने हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. बॅरिकेड हटवेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा सल्लाही शाळा प्रशासनाला देण्यात आला आहे.
झाड कोसळून महिला जखमी
विलेपार्ले पूर्व येथील मिलन सबवे येथे रॅपिडो मोटरसायकलवर झाड पडून एक महिला जखमी झाली. नीलम गुप्ता (३६) असे महिलेचे नाव असून तिला वांद्रे येथे भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला.
अॅन्टॉप हिल परिसरात दरड कोसळली
अॅन्टॉप हिल परिसरातील रावळी कॅम्प भागात बुधवारी पहाटे दरड कोसळली. हेमंत मांजरेकर मार्ग, शुक्ला हॉटेलजवळील इंदिरानगर झोपडपट्टी आणि हनुमान टेकडी परिसरात दरडीचा काही भाग व झाड घरावर पडल्याची घटना घडली. या दुर्घटनेत अनिता (२५) ही महिला किरकोळ जखमी झाली. तिला शीव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर तिला घरी पाठविण्यात आले.



























































