विद्यार्थिनीवरील अत्याचाराप्रकरणी शिपायाला २० वर्षांची सक्तमजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mumbai Crime

दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार करणाऱ्या शाळेच्या माजी शिपायाला विशेष सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत आरोपी शिपायाला २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

ही घटना घडली तेव्हा पीडित मुलगी १५ वर्षांची होती ती दक्षिण मुंबईतील एका शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होती. २९ जुलै २०२२ रोजी शाळेच्या स्नेहसंमेलनादरम्यान आरोपीने मुलीला स्टेजमागे मिठी मारली आणि बळजबरीने तिचे चुंबन घेतले. तसेच, ही गोष्ट कुणाला सांगितल्यास शाळेत बदनाम करण्याची धमकी दिली. २४ ऑगस्ट २०२२ आरोपीने भीती दाखवून आणि शिक्षणात अडथळा आणण्याची धमकी देऊन पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणाची माहिती
मुलीने दिल्यानंतर मुलीच्या आईने तत्काळ शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला आणि गावदेवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.

विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांनी या खटल्यावर निकाल देताना स्पष्ट केले की, लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये पीडितेच्या साक्षीला नेहमीच पुराव्याच्या पुष्टीची गरज असते असे नाही. जर पीडितेची साक्ष आत्मविश्वास निर्माण करणारी आणि विश्वासार्ह असेल तर ती शिक्षेचा एकमेव आधार बनू शकते. न्यायालयाने नमूद केले की, या प्रकरणात पीडितेची साक्ष कोणत्याही विरोधाभासाविना स्पष्ट होती आणि ती वैद्यकीय पुराव्यांशीही सुसंगत होती. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.