
वाडा तालुक्यातील बोरांडा व आंबिस्ते या गावांमध्ये उभारण्यात येत असलेली छेडा फूड्स कंपनी वादात सापडली आहे. या उद्योग समूहाने मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरून निसर्गाची हानी केली असून मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खननही केले आहे. याबाबतच्या तक्रारीची पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून छेडा फूड्सने किती डोंगर फोडला याची मोजणी करा, असा आदेश वाड तहसील प्रशासनाला दिला आहे.
बोरांडा व आंबिस्ते या गावांच्या हद्दीत छेडा फूड्सने सुमारे 65 एकर जमिनीवर मोठा कारखाना उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र कंपनी उभारताना मोठ्या प्रमाणात निसर्गाची हानी करून डोंगर फोडल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने वाडा तहसीलदारांनी पाहणी करून अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला होता. मात्र यामध्ये नेमका किती प्रमाणात डोंगर फोडण्यात आला याचा तपशील नसल्याने पुन्हा संयुक्त पाहणी व मोजणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नगररचना, वाडा तहसील कार्यालय, जिल्हा खनिकर्म अधिकारी व तालुका भूमिअभिलेख विभागांना दिले आहेत.
अहवालाकडे लक्ष
उद्योग समूहाच्या मालकीच्या भागात असणाऱ्या टेकडीचा काही भाग फोडून तयार झालेले गौण खनिज हे सखल भागात भरावासाठी वापरण्यात आल्याचे कंपनी प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित प्रकल्पाच्या ठिकाणी प्राप्त असणाऱ्या परवानगीपेक्षा अतिरिक्त गौण खनिज वापर झाला आहे की नाही हे स्पष्ट होईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी सांगितले.




























































