मृत्युपत्रावर स्वाक्षरी आणि काही तासांतच शिक्षिकेला संपवले, मालमत्तेसाठी बनावट वारसदारांचा कट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मृत्युपत्रावर स्वाक्षरी घेतली आणि काही तासांतच शिक्षिकेची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना आसनगाव परिसरात घडली आहे. संगीता चंदनशिवे असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून जिवलग मित्रानेच साथीदारांसह हा थरारक कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सिन्नर-घोटी मार्गावर फेकला. कल्याण गुन्हे शाखेने याप्रकरणी गोकुळ आव्हाड, तुषार पारखे, संतोष जाधव या तिघांना अटक केली. तर विनोद पांडे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मोहने-आंबिवली येथे राहणाऱ्या संगीता चंदनशिवे या १४ जुलै रोजी शाळेत जाण्यासाठी बाहेर पडल्या. आसनगाव येथे एलआयसीच्या कामानिमित्त जाणार असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत त्या घरी न आल्याने कुटुंबीयांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. कोळसेवाडी पोलीस आणि कल्याण गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. चार दिवसांनी घोटी परिसरातील एका रुग्णालयाजवळ संगीता चंदनशिवे यांचा मृतदेह आढळून आला.

एटीएम ट्रान्सझॅक्शनवरून लागला छडा

पोलिसांच्या तपासात शिक्षिकेच्या एटीएममधून घोटी परिसरात पैसे काढण्यात आल्याचे उघड झाले. पोलिसांनी एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांनी अधिक तपास केला असता गोकुळ आव्हाडचे नाव समोर आले. गोकुळ आणि संगीता यांच्यात अनेक वर्षांपासून मैत्री होती. मात्र संगीता यांची मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्यासाठी तो त्यांच्यावर दबाव टाकत होता. संगीता यांनी नकार दिल्यानंतर त्याने त्यांच्या हत्येचा कट रचला.