
नवी साडी दिली नाही म्हणून संतापलेल्या पत्नीने डोक्यात कुकरचे झाकण घालून नवऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली आहे. हरिराम सिंग असे पतीचे नाव आहे. याप्रकरणी बदलापूर पोलिसांनी सुनितादेवी हिला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बदलापूरच्या शिरगाव परिसरात ३५ वर्षीय हरिराम सिंग हा पत्नी सुनितादेवी आणि पाच वर्षांच्या मुलासोबत राहत होता. हरिराम हा अंथरुणाला खिळलेला होता. तर पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद होत होते. अशातच त्यांच्यात नवी साडी खरेदी करण्यावरून पुन्हा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की सुनिताने रागाच्या भरात कुकरचे झाकण हरिरामच्या डोक्यात घातले. एवढ्यावरच न थांबता त्याने गळा दाबून पतीची हत्या केली. त्यावेळी त्यांचा पाच वर्षांचा चिमुकलादेखील घरातच होता.
असा झाला उलगडा
चिमुकल्याने धावत जाऊन शेजाऱ्यांना माहिती दिली. शेजारी घरी गेले तेव्हा हरिराम बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा पत्नीने बनाव रचला. मात्र शवविच्छेदन अहवालात डोक्यावर गंभीर दुखापत आणि गळा आवळल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हत्येचा उलगडा झाला. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पत्नी सुनिताविरोधात गुन्हा दाखल करून तिला बेड्या ठोकल्या. या हत्येमध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का? त्यावेळी घटनास्थळी आणखी कोणी होते का? याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.




























































