
पनवेल रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम सुरू असतानाच अचानक फलाटावरचे जुने छत आणि ओव्हरहेड इक्विपमेंट सपोर्ट (ओएचई) खांब मोठा आवाज करत कोसळला. सुदैवाने त्या क्षणी आसपास कुणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे फलाटावर प्रवाशांची पळापळ झाली.
मुंबई रेल्वे विकास महामंडळ यांच्या माध्यमातून पनवेल रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण आणि प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत जुन्या व धोकादायक ठरत असलेल्या संरचना हटवण्याचे काम सुरू असताना अचानक स्थानकावरील जुने छत आणि ओएचई लाइनचा सपोर्ट खांब कोसळला.
रेल्वे सेवेवर परिणाम नाही
घटना घडताच रेल्वे प्रशासन, सुरक्षा कर्मचारी आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. परिसर सुरक्षित करून ढिगारा हटवण्याचे काम त्वरित सुरू केले. या घटनेमुळे काही काळ कामात अडथळा निर्माण झाला असला तरी रेल्वेच्या नियमित वाहतुकीवर परिणाम झाला नाही

























































