
उत्तर कश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील शेरी भागातील फथागड येथे एका संयुक्त मोहिमेदरम्यान शस्त्रे आणि दारूगोळ्यासह एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. लष्कराची 46 राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-कश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची 53 वी बटालियन यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून शस्त्रे व दारूगोळा जप्त केला, असे सूत्रांनी सांगितले.
कुलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन स्थलांतरित मजुरांची हत्या झाल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे. केलम भागात शुक्रवारी उशिरा एका विटांच्या भट्टिवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दीपक रात्राय आणि भूपिंदर हे दोघे मारले गेले. लष्कर-ए-तैयबाची एक उप-संघटना मानली जाणारी द रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.






















































