
हिंदुस्थानी ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने अमेरिकेत सुरू असलेल्या सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेच्या रॅपिड प्रकारात अव्वल स्थान पटकावले आहे. नऊ फेऱ्यांनंतर त्याने संभाव्य 18 पैकी 12 गुण मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर एक गुणाची आघाडी घेतली आहे. आता उर्वरित 18 ब्लिट्झ सामन्यांनंतर विजेतेपदाचा फैसला होणार असून, वर्षाअखेरीस होणाऱ्या ग्रँड चेस टूर फायनलमध्ये स्थान मिळवण्याच्या त्याच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत.
रॅपिड विभागाच्या नवव्या आणि अखेरच्या फेरीत प्रज्ञानंदला नेदरलँड्सच्या जॉर्डन व्हान फॉरेस्ट याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र, त्या आधीच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने 12 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. रॅपिड प्रकारात त्याने चार विजय, चार बरोबरी आणि केवळ एक पराभव अशी उल्लेखनीय कामगिरी केली. उझबेकिस्तानचा जावोखिर सिंजारोव आणि अमेरिकेचा वेस्ली सो हे प्रत्येकी 11 गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. याच सिंजारोवचा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत डी. गुकेश याच्याशी सामना होणार आहे.
रॅपिड प्रकार संपल्यानंतर आता सर्व खेळाडूंना 18 ब्लिट्झ सामने खेळायचे आहेत. प्रत्येक विजयासाठी एक गुण मिळणार असल्याने प्रज्ञानंदसमोर आघाडी कायम राखण्याचे मोठे आव्हान असेल. अमेरिकेचे लेव्हॉन अरोनियन आणि लेनियर डोमिंगेझ, नेदरलँड्सचा अनिश गिरी तसेच जर्मनीचा व्हिन्सेंट कीमर हे प्रत्येकी 9 गुणांसह संयुक्त चौथ्या स्थानावर आहेत.





























































