लंकादहन करण्यासाठी हिंदुस्थानची तयारी सुरू, 7 ऑगस्टपासून सराव सामना खेळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीलंकेला पराभूत करण्यासाठी हिंदुस्थानने पायाभरणी करायला सुरुवात केली आहे. फलंदाजांना चांगला सराव मिळावा यासाठी आता चार नेट्स गोलंदाजांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्याचबरोबर 7 ऑगस्टपासून सराव सामनाही खेळणार असल्याचे आता समोर आले आहे.

नेट्स गोलंदाज म्हणून कोणाची वर्णी

15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी, हर्ष दुबे, शिवांग कुमार, तनुष कोटियन आणि विप्राज निगम हे नेट गोलंदाज म्हणून हिंदुस्थानी संघात सामील झाले आहेत. हे चार खेळाडू श्रीलंकेतील तयारीदरम्यान शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाला मदत करतील. हिंदुस्थानी संघ श्रीलंकेत दाखल झाला असून कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी कोलंबोमध्ये एक सराव सामना खेळणार आहे.

हिंदुस्थान पाचव्या स्थानावर

ही दोन सामन्यांची मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. हिंदुस्थान सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. संघाने आपल्या नऊ सामन्यांपैकी चार जिंकले आहेत आणि चार गमावले आहेत.  हिंदुस्थानी संघाची विजयाची टक्केवारी  48.150 आहे.

हिंदुस्थानी संघ पुढीलप्रमाणे

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, आकिब नबी.

दुखापतींमुळे तणाव वाढला

मालिकेपूर्वी हिंदुस्थानी संघातील अनेक खेळाडूंना दुखापती झाल्या आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी आकिब नबीचा संघात समावेश करण्यात आला आहे. हर्षित राणा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर आहे, तर नितीश कुमार रेड्डी क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीतून सावरत आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर हॅमस्ट्रिंगच्या समस्येमुळे पहिली कसोटी खेळू शकणार नाही. वेगवान गोलंदाज आकाशदीपदेखील अनुपलब्ध आहे, कारण तो पाठीच्या स्ट्रेस रिऍक्शनमधून सावरत आहे

तीन दिवसीय सराव सामना

कसोटी मालिकेपूर्वी हिंदुस्थान 7 ऑगस्टपासून कोलंबो येथील नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदानावर तीन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. पहिला कसोटी सामना 15 ते 19 ऑगस्टदरम्यान गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. दुसरा आणि अंतिम कसोटी सामना 23 ते 27 ऑगस्टदरम्यान कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जाईल.