
मुंबई महापौर चषक राष्ट्रीय फिल्ड इनडोअर तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत पोयसर जिमखान्याच्या तिरंदाजांनी अचूक लक्ष्यभेद करत तब्बल 35 पदकांची कमाई केली. नुकत्याच अंधेरीतील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेत पोयसर जिमखान्याने 23 सुवर्ण, 11 रौप्य आणि 1 कांस्य पदकांची लयलूट केली.
राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळवताना या यशात पोयसर जिमखान्याचा सिंहाचा वाटा होता. या कामगिरीत पोयसरच्या खेळाडूंनी 13 सुवर्ण व 5 रौप्य पदके जिंकून आपला दबदबा दाखवला होता. तसेच मुंबई स्तरावरील स्पर्धेतही 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 कांस्य पदकांसह उपविजेतेपदाची ट्रॉफी पटकावली.
या महापौर स्पर्धेत वियान नाझरेथने पाच सुवर्णपदकांसह सर्वाधिक चमक दाखवली, तर पानव शाहने चार सुवर्ण व चार रौप्य पदके जिंकत आपली छाप पाडली. प्रशिक्षक मिलिंद पांचाळ यांनी या यशाचे श्रेय खेळाडूंची मेहनत, पालकांचे सहकार्य, मुख्य प्रशिक्षक सुभाष नायर आणि पोयसर जिमखानाच्या मार्गदर्शनाला दिले. या स्पर्धेत जिमखान्याच्या मयूर पांचाळ, प्रगती झा, युग मेहता, धैर्य सोनी, दीपक वाधवान, स्वरोव्हस्का डिसोझा, रेयांश नादियाना आणि अध्रित पाखरे यांनीही पदके जिंकली.




























































