ठसा – श्रीधर अंभोरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गणेश उदावंत

चित्रकला ही प्रगल्भ आविष्कारातून प्रकट होत असते. कलाकाराच्या सर्जनशील मनाचा कॅनव्हास जेव्हा व्यापक होतो तेव्हाच कलाकृती बोलकी होते. तिथे रेषा व रंग कमी असले तरी ते अभिव्यक्त होतात. अशा अभिक्यक्त होणाऱ्या चित्रांचे निर्माते ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी जालना येथे अखेरचा श्वास घेतला. अजोड कलाकृती रेखाटणारे श्रीधर अंभोरे हे अविवाहित होते. विदर्भातील चिखलगाव (ता. पातूर) येथे त्यांचा जन्म झाला. वसतीगृहात राहून ते माध्यमिक स्तरावरील शिक्षण घेत असतानाच टपाल खात्यात नोकरीस लागले. इथपर्यंतच्या प्रवासात त्यांना नकनके प्रसंग अनुभवास आले. हे प्रेरक प्रसंग नव्या उर्मीने प्रकट होण्यासाठी मार्ग शोधत होते आणि चित्रकलेचे कुठलेही शिक्षण घेतलेले नसताना ते टपाल खात्यातील दगदगीची नोकरी सांभाळीत चित्रकलेशी एकरूप झाले ते कायमचे. याच चित्रकलेने त्यांना जागतिक ख्यातीचे कलाकंत म्हणून मान मिळवून दिला. फाय फाउंडेशन पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. इतरही अनेक पुरस्काराचे ते मानकरी ठरले.

श्रीधर अंभोरे यांनी कागदावर कायमच काळा रंग कापरला. ब्लॅक ऍण्ड व्हाईट अशी ही चित्रे आहेत. त्यातील प्रत्येक रेषा बोलते. आडकळणाची लयदार झाडांसारखी गर्द, लताकेलींसारखी लडिवाळ रेषा चित्रात भाव खाऊन जातात. म्हणूनच ते मनस्वी चित्रकार ठरले. चिंतन , निर्मितीमूल्य , जबरदस्त लय आणि विषयातील आंतरिक प्रेरणा ते चित्रांमध्ये अधोरेखित करीत असत. हाच त्यांचा चित्रगुण होता. एक मात्र खरे की, त्यांनी कलेचा बाजार केला नाही. चिंतनाला प्राधान्य देत त्यांनी नामकंत लेखकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे रेखाटली, पण त्यासाठी मानधन घेतले नाही. मैत्रपर भाव त्यांनी कायम जपला.

आंतरिक प्रेरणेतून आणि साहित्याच्या आकडीतून दिंडी, आदिम हे नियतकालिक त्यांनी काढले. स्वत: पदरमोड करून अभिजात मराठी भाषेची साहित्य सेवा करण्यात ते तसूभर कमी पडले नाहीत. लेखकांशी असलेला स्नेह व ऋजूता त्यांना नियतकालिक प्रकाशित करण्यासाठी कामी आला. लेखांसोबत श्रीधर अंभोरे यांचे ठसठशीत रेखाटन असायचेच. त्यांच्या चित्रकलेवर ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे यांनी ‘श्रीधररेषा’ हे पुस्तक लिहून त्यांचे कला जीवन मांडले आहे.

विदर्भ जन्मभूमी असूनही त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथे जवळपास चार दशके वास्तव्य केले. चार-पाच वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीच्या बिकटप्रसंगी मराठवाड्यात जालना येथील आपल्या पुतण्याकडे ते राहण्यास आले होते. येथेही ते साहित्यिकांचा गोतावळा बाळगून होते. साधी राहणी, समोरच्याचा आदर हा त्यांचा व्यक्तिगुण वाखाणण्यासारखा होता. अशा या कलेचा महामेरू असणारे श्रीधर अंभोरे यांच्या जाण्याने कलेचा आधारवड हरपला आहे.