
हिंदुस्थानी क्रिकेट संघ स्वातंत्र्यदिनी अर्थात 15 ऑगस्ट रोजी श्रीलंकेविरुद्ध आपला 600 वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. गॉल इंटरनॅशनल स्टेडियमवर सकाळी 10 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या ऐतिहासिक सामन्यात संघाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याचे कर्णधार शुभमन गिलने म्हटले आहे. विशेष म्हणजे 150 वर्षांच्या क्रिकेट इतिहासामध्ये पहिल्यांदाच हिंदुस्थानचा संघ स्वातंत्र्यदिनी कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
हिंदुस्थानने आपला पहिला कसोटी सामना 1932 मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत हिंदुस्थानने 599 कसोटी सामने खेळले आहेत. यात हिंदुस्थानने 186 कसोटी सामने जिंकले असून 188 सामन्यात पराभव स्वीकारला आहे. तर 224 सामने अनिर्णित राहिला आहे. याशिवाय एक सामना बरोबरीत सुटला आहे. तर हिंदुस्थान आणि श्रीलंकेत आतापर्यंत 46 कसोटी सामने खेळले गेले असून यात हिंदुस्थानने 22 विजय मिळवले, तर 7 पराभव स्वीकारले. तसेच 17 सामने अनिर्णित राहिले आहेत. श्रीलंकेच्या भूमिवेर 24 सामन्यांपैकी 7 हिंदुस्थानने जिंकले आहेत, तर 7 गमावले आहेत. तर 8 सामना अनिर्णित राहिलेले आहेत.
WTC फायनलच्या शर्यतीसाठी मालिका महत्त्वाची
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत हिंदुस्थान सध्या 48.15 टक्के गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. श्रीलंका 41.67 टक्क्यांसह सहाव्या, तर बांगलादेश 58.33 टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. WTC फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला आगामी काळात 6 ते 7 कसोटी सामने जिंकणे आवश्यक आहे. हिंदुस्थानने ही 2 सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकल्यास हिंदुस्थानची टक्केवारी 57.58 टक्क्यांवर पोहोचेल. मालिका 1-0 ने जिंकल्यास आणि एक सामना ड्रॉ झाल्या गुण 51.51 टक्के होतील.
गॉलच्या खेळपट्टीवर फिरकीचे आव्हान
गॉलची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अत्यंत अनुकूल मानली जाते. या मैदानावर आतापर्यंत झालेल्या 49 कसोटी सामन्यांमध्ये सुमारे 68 टक्के विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या आहेत. हिंदुस्थान या सामन्यात 3 डावखुऱ्या फिरकीपटूंसह उतरण्याची शक्यता आहे. यात रवींद्र जडेजा, मानव सुथार आणि कुलदीप यादव यांचा समावेश असू शकतो.
हिंदुस्थानच्या संघात अनुभवाची कमतरता
दरम्यान, कर्णधार शुभमन गिलसह तब्बल 12 खेळाडूंनी श्रीलंकेच्या भूमीवर एकही कसोटी सामना खेळलेला नाही. फक्त 4 खेळाडूंनाच येथे खेळण्याचा अनुभव आहे. जसप्रीत बुमराह या दौऱ्यात उपलब्ध नसल्याने मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल. त्याच्या सोबतीला प्रसिद्ध कृष्णा किंवा तरुण गोलंदाज गुरनूर ब्रारला संधी मिळू शकते. साई सुदर्शनच्या अनुपस्थितीत देवदत्त पडिक्कल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. मधल्या फळीत ध्रुव जुरेलला पुन्हा सिद्ध करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
हिंदुस्थानसाठी डावे ठरणार उजवे, गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल यांनी सांगितली पहिल्या कसोटीची रणनीती






























































