Pune News – दहावीत चांगले मार्क मिळवून देतो, मांडीवर बसवलं…; विद्येच्या माहेरघरात रिलस्टार भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्येचं माहेरघर पुण्यात एका स्वयंघोषित रिलस्टार भोंदू बाबाने दहावीत शिकणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकरण समोर आला आहे. सोशल मीडियावर रिल बनवून आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत स्वप्नील लांडे या भोंदू बाबाने अनेक महिलांना जाळ्यात ओढल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपी भोंदू स्वप्नील लांडे पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील लांडे या स्वयंघोषित भोंदू बाबाने एका अल्पवयीन मुलीला दहावीच्या परीक्षेत चांगले मार्ग मिळवून देतो, असे सांगत आपल्या जाळ्यात ओढलं. हा भोंदू एवढ्यावरच थांबला नाही. त्याने तिला मांडीवर बसवलं आणि तिच्या कानात मंत्र म्हणण्याचा बहाणा करून तिचे लैगिंक शोषण केले. हा सर्व प्रकार कुटुंबीयांसाठी अनपेक्षित होता. त्यांनी तात्काळ पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनला जात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी भोंदू बाबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्यात दैवी शक्ती असल्याचा बनाव करणारा हा भोंदू पोलिसांत तक्रार दाखल होताच फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या भोंदूचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. नुकतेच गुरूपौर्णिमेनिमित्त या भोंदूच्या भक्ताने त्याच्या पायाचे पाणी प्यायल्याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. असे अनेक व्हिडीओ त्याने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून अपलोड करत तरुण-तरुणींना जाळ्यात ओढल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच लांडेने अशाच प्रकारे धर्माच्या आधारे चमत्काराचा धाक दाखवून आणखी किती जणांना फसवलं आहे किंवा त्यांचं लैंगिक शोषण केलं आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.