Ratnagiri News – राजापूरच्या कातळसड्यांवर दुर्मिळ ‘कंदीलपुष्प’ची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो सौजन्य - मनोज मराठे

पश्चिम घाट परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण आकार आणि आकर्षक फुलांसाठी प्रसिद्ध असलेले कंदीलपुष्प कोकणातील कातळसड्यांवरही आढळून येत आहे. कंदीलपुष्पाच्या विविध प्रजातींपैकी संकटग्रस्त मानली जाणारी ‘सेरोपेजिया विंकाएफोलिया’ ही दुर्मिळ प्रजाती राजापूर तालुक्यातील काही मर्यादित अधिवासांमध्ये आढळून आली आहे. कातळशिल्प संशोधक आणि सड्यांवरील रानफुलांचे अभ्यासक धनंजय मराठे यांनी या प्रजातीची नोंद केली आहे.

पावसाळ्यात जमिनीखालील कंदापासून या वनस्पतीची वेल वाढते. साधारण जुलै ते सप्टेंबर या कालावधीत तिला फुले येतात. सुमारे ३ ते ८ सेंटीमीटर लांबीचे आणि पिवळसर रंगाचे हे फूल दिसायला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून, त्याच्या नलिकाकार रचनेवर जांभळ्या रंगाचे पट्टे किंवा ठिपके आढळतात. पारंपरिक काचेच्या कंदिलासारखा फुलाचा आकार असल्याने या वनस्पतीला ‘कंदीलपुष्प’ असे नाव पडले आहे.

कंदीलपुष्पाची परागीकरण प्रक्रिया विशेष आकर्षक आहे. फुलातून येणाऱ्या विशिष्ट गंधामुळे लहान माशा किंवा इतर कीटक त्याकडे आकर्षित होतात. फुलाच्या नलिकेसारख्या भागात प्रवेश केल्यानंतर काही काळ ते त्यात अडकतात. या दरम्यान त्यांच्या शरीराला परागकण चिकटतात. परागीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फुलाची रचना सैल होत जाते आणि कीटक बाहेर पडतो. वनस्पतीच्या पुनरुत्पादनासाठी ही नैसर्गिक यंत्रणा महत्त्वाची मानली जाते.

पश्चिम घाट आणि कोकणातील कातळसडे परिसरात आढळणाऱ्या अशा दुर्मिळ वनस्पतींच्या अधिवासावर मानवी हस्तक्षेप, जंगलतोड आणि नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास यांचा परिणाम होत आहे. त्यामुळे कंदीलपुष्पाच्या अस्तित्वासमोरही आव्हान निर्माण झाले आहे. कंदीलपुष्पाच्या सेरोपेजिया अटेन्युएटा, सेरोपेजिया ओक्युलाटा आणि सेरोपेजिया विंकाएफोलिया या प्रजातींपैकी ‘सेरोपेजिया विंकाएफोलिया’ ही प्रजाती राजापूर तालुक्यातील काही मोजक्या आणि मर्यादित अधिवासांमध्येच आढळून आल्याचे धनंजय मराठे यांनी सांगितले.

दुर्मिळ आणि संकटग्रस्त वनस्पतींचे अस्तित्व हे त्या परिसरातील जैवविविधतेचे महत्त्वपूर्ण निदर्शक मानले जाते. कातळसडे हे केवळ भूशास्त्रीय किंवा पुरातत्त्वीय वारसा नसून ते अनेक वैशिष्ट्यपूर्ण रानफुले, वनस्पती आणि सूक्ष्मजीवांचे नैसर्गिक अधिवास आहेत. त्यामुळे अशा अधिवासांचे संवर्धन करून दुर्मिळ कंदीलपुष्पाचे अस्तित्व टिकविण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा धनंजय मराठे यांनी व्यक्त केली.