
राजस्थानमध्ये वैद्यकीय क्षेत्रात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (FMG) वारंवार नापास होऊनही लाखो रुपयांची लाच देऊन बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसच्या (NBEMS) शिस्तबद्ध आणि कडक नियमांचे उल्लघन करून या रॅकेटने थेट आरोग्य यंत्रणेचा विश्वासघात केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत 30 जणांना अटक करण्यात आली असून 100 हून अधिक परदेशी वैद्यकीय पदवीधारकांची कसून चौकशी सुरू आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, यासंपूर्ण प्रक्रियेत परदेशी वैद्यकीय पदवीधर, राजस्थान मेडिकल कौन्सिलचे (RMC) काही कर्मचारी यांचा सहभाग आहे. या टोळीने परीक्षा पद्धतीतील त्रुटींचा गैरफायदा घेत बनावट FMG स्क्रीनिंग प्रमाणपत्रांचे जाळे पसरवले होते. परीक्षा उत्तीर्ण होणे अशक्य झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी लाखोंची रक्कम मोजली आणि थेट बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे इंटर्नशिप मिळवली. 4 फेब्रुवारी 2026 रोजी जयपूरमध्ये याप्रकरणी फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सहभागी असलेल्या आशिष कुमार (30) याने 2011 मध्ये पाकिस्तानमधून एमबीबीएस पदवी पूर्ण केली होती. त्याने FMG परीक्षा तीन वेळा दिली. पण त्याला एकदाही यश मिळाले नाही. अखेर वैतागून त्याने शुभम गुर्जर या मध्यस्ती करणाऱ्या दलालाशी संपर्क साधला आणि 29 लाख रुपये देऊन एक बनावट FMG प्रमाणपत्र विकत घेतले. या बोगस प्रमाणपत्राच्या जोरावर त्याने राजस्थान मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणीसाठी अर्ज देखील केला होता. या बनावट प्रमाणपत्र प्रकरणामुळे त्याचे वैद्यकीय करिअर धोक्यात आले आहे.
दुसऱ्या एका प्रकरणात, राजेंद्र कुमार यादव (39) याने 2006 ते 2012 दरम्यान चीनमधून एमबीबीएसचे शिक्षण घेतले होते. 2012 मध्ये त्याने FMG परीक्षा सलग आठ वेळा दिली. परंतु प्रत्येक वेळी तो नापास झाला. त्यानंतर संदीप नावाच्या व्यक्तीच्या मदतीने त्याने तब्बल 29 लाख रुपये देऊन बनावट प्रमाणपत्र मिळवले. राजेंद्र हा सध्या त्याच्या पत्नीद्वारे चालवल्या जाणाऱ्या जयपूरमधील ‘नारायण हॉस्पिटल’चे व्यवस्थापन पाहत होता.
तिसरा आरोपी नरेश रोलानिया (26) याने 2021 मध्ये पाकिस्तानमधून एमबीबीएस पूर्ण केले होते आणि तो देखील तीन वेळा FMG परीक्षा नापास झाला होता. त्याच्या एका नातेवाईकाने 26 लाख रुपये देऊन त्याच्यासाठी बनावट प्रमाणपत्र तयार करून घेतले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने उदयपूर मेडिकल कॉलेजमधून आपली इंटर्नशिप पूर्ण केली. कोणतीही वैध नोंदणी किंवा परीक्षा पास नसतानाही तो कोटपुतळी येथील ‘पल्स हॉस्पिटल’च्या आपत्कालीन विभागात थेट रुग्णांवर उपचार करत असल्याचे तपासात समोर झाले आहे. या रॅकेटमुळे वैद्यकीय सुरक्षिततेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



























































