धक्कादायक! महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशाळेत गेल्या दोन वर्षात 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये गेल्या दोन वर्षांत तब्बल ५८४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी तब्बल 273 विद्यार्थ्यांचा मृत्यू हा गंभीर आजारपणामुळे झाला आहे. या आकडेवारीत सरकारी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची संख्या अनुदानित आश्रमशाळांच्या तुलनेत जास्त असल्याचे समोर आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षांत सरकारी आश्रमशाळांमधील 364, तर अनुदानित आश्रमशाळांमधील 200 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या कारणांमध्ये गंभीर आजार, अपघात, आत्महत्या आणि सर्पदंश यांचा समावेश आहे.

गडचिरोलीतील धानोरे येथील निवासी आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थीनींचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला. या दरम्यान आता आलेली आकडेवारी ही धक्कादायक आहे.

आश्रम शाळांमध्ये गंभीर आजारामुळे एकूण 273 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये सरकारी आश्रमशाळांतील 182 आणि अनुदानित आश्रमशाळांतील 91 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्याखालोखाल अपघाती मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. सरकारी आश्रमशाळांतील 155 आणि अनुदानित आश्रमशाळांतील 73 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.