
इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेला मोठा लष्करी आणि आर्थिक फटका बसला असून, अमेरिकेने आपले किमान ४५ एमक्यू-९ रीपर पाळत ठेवणारे आणि हल्ला करणारे अद्ययावत ड्रोन गमावले आहेत. ही संख्या अमेरिकेच्या एकूण कार्यरत ड्रोन ताफ्याच्या जवळपास २५ टक्के इतकी आहे. एका अहवालानुसार, या प्रचंड नुकसानीमुळे अमेरिकन करदात्यांवर तब्बल १.३ अब्ज डॉलर्सचा (सुमारे १०,९०० कोटी रुपये) बोजा पडण्याची शक्यता आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
द वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, या युद्धात अमेरिकेचे जे ड्रोन नष्ट झाले आहेत, त्यापैकी सर्वच ड्रोन शत्रूच्या हल्ल्यात पाडले गेले नाहीत. काही ड्रोन आणि त्यांच्या ऑपरेटरमधील संपर्क लिंक तुटल्यामुळे ते कोसळून नष्ट झाल्याची माहिती एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने दिली आहे. २८ फेब्रुवारी रोजी जेव्हा हा संघर्ष सुरू झाला, तेव्हा अमेरिकेकडे अंदाजे १८५ रीपर ड्रोन होते. यापैकी १६५ हवाई दलाकडे, तर उर्वरित २० मरीन कॉर्प्सकडे तैनात होते. विशेष म्हणजे आशिया-प्रशांत क्षेत्रात तैनात असलेल्या मरीन कॉर्प्सच्या ताफ्यातील एकाही ड्रोनचे नुकसान झालेले नाही. प्रामुख्याने होर्मुझच्या सामुद्रधुनी परिसरातील कारवाईदरम्यान हे ड्रोन पाडले गेले आहेत. या ड्रोनचा वेग कमी असल्याने आणि ते तुलनेने कमी उंचीवरून उड्डाण करत असल्याने इराणचे सैन्य आणि येमेन व इराकमधील इराण-समर्थक गटांना त्यांना लक्ष्य करणे सोपे गेले.
जनरल ॲटॉमिक्स कंपनीने विकसित केलेले एमक्यू-९ रीपर हे ड्रोन मुख्यत्वे पाळत ठेवण्यासाठी आणि अचूक हवाई हल्ले करण्यासाठी ओळखले जातात. २००७ मध्ये अमेरिकन सैन्यात समाविष्ट झाल्यापासून, मध्य पूर्व, अफगाणिस्तान आणि इराकमधील विविध दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये यांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला आहे. एका रीपर ड्रोनची किंमत त्यामध्ये बसवण्यात आलेले हार्डवेअर आणि शस्त्रास्त्रांनुसार ३ कोटी ते ५ कोटी डॉलर्सच्या (अंदाजे २५० ते ४२० कोटी रुपये) घरात असते. दरम्यान, एकीकडे अमेरिकेचा शस्त्रास्त्रांचा साठा वेगाने कमी होत असतानाच, ड्रोनच्या या मोठ्या नुकसानीमुळे वॉशिंग्टनमधील संरक्षण वर्तुळाच्या चिंता आणखी वाढल्या आहेत.































































