
>>संजय शेट्ये
पुस्तकं ही केवळ कागदावर छापलेली अक्षरं नसतात, ती संस्कृतीची जपणूक करणारी, विचारांना दिशा देणारी आणि पिढय़ान्पिढय़ा माणसांना समृद्ध करणारी संपत्ती असते. अशा या पुस्तकविश्वाला आयुष्यभर वाहून घेतलेल्या काही मोजक्या व्यक्तींमध्ये जगत प्रभू टेकाट्टे यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं. जगत प्रभू टेकाट्टे यांच्या पुस्तकविश्वातील प्रवासाची सुरुवात 1986 साली भारतातील अत्यंत प्रतिष्ठत स्टँड बुक स्टॉलमध्ये झाली. तेथे त्यांनी 23 वर्षे सेल्स हेड म्हणून पुस्तक विक्री, वितरण व्यवस्था, वाचकांची मानसिकता आणि प्रकाशन क्षेत्रातील बारकावे यांचा सखोल अभ्यास केला. विशेष म्हणजे भारतातील पुस्तकविश्वातील दिग्गज व्यक्तिमत्त्व टी. एन. शानभाग यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुस्तक प्रकाशन, वितरण आणि विविध विषयांतील ग्रंथसंपदेचं व्यवस्थापन यातील ज्ञान आत्मसात केलं. 2009 पासून ते सोमय्या उद्योग समूहाच्या प्रतिष्ठत ‘किताबखाना’ या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी ही जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्या दूरदृष्टी, व्यवस्थापन कौशल्य आणि पुस्तकांवरील निस्सीम प्रेमामुळे ‘किताबखाना’ हे केवळ पुस्तकांचं दुकान न राहता लेखक, वाचक, संशोधक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमी यांचं सांस्कृतिक केंद्र बनलं आहे. जागतिक पुस्तकविश्वातील नव्या प्रवाहांशी भारतीय वाचकांना जोडून ठेवण्याचं कामही त्यांनी सातत्याने केलं आहे. गेल्या 12 वर्षांपासून ते नियमितपणे लंडन येथे भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रकाशक प्रदर्शनाला (London Book Fair) उपस्थित राहत आहेत. जगभरातील प्रकाशन विश्वातील नव्या घडामोडी, पुस्तक संस्कृतीतील बदल आणि जागतिक दर्जाच्या संकल्पना भारतात आणण्याचा त्यांचा प्रयत्न पुस्तकविश्वासाठी मोलाचा ठरला आहे. त्यांच्या कार्याचं आणखी महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे नवोदित लेखकांना दिलेलं व्यासपीठ. अनेक लेखकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनामागे त्यांची प्रेरणा, मार्गदर्शन आणि पाठबळ राहिलं आहे. नव्या लेखकांना प्रोत्साहन देताना त्यांनी कधीही प्रसिद्धीचा आग्रह धरला नाही. साहित्यविश्वात नवी प्रतिभा घडावी, पुस्तकांचा प्रसार व्हावा आणि वाचनसंस्कृती अधिक समृद्ध व्हावी, हीच त्यांची कायमची भूमिका राहिली. आजच्या डिजिटल युगात पुस्तकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असताना वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी जे लोक निःस्वार्थपणे कार्यरत आहेत, त्यामध्ये टेकाट्टे यांचं योगदान विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी केवळ पुस्तकांची विक्री केली नाही, तर पुस्तकांभोवती विचारांची, संवादाची आणि संस्कृतीची समृद्ध परंपरा निर्माण केली. पुस्तकांच्या माध्यमातून समाजाला विचार देणाऱ्या प्रत्येक लेखकाला आणि प्रत्येक वाचकाला जोडण्याचं महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी गेली चार दशकं अविरतपणे केलं आहे. समाजाला विचार देणारी पुस्तकं आणि त्या पुस्तकांना जपणारी माणसं यांचं महत्त्व काळानुसार अधिक वाढत जाणार आहे. अशा व्यक्तिमत्त्वांचा सन्मान हा केवळ त्यांच्या कार्याचा गौरव नसून समाजाच्या सांस्कृतिक जाणिवांचाही गौरव आहे.
































































