महायुतीत पुन्हा बिनसलं, एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांची दांडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पुन्हा काहीतरी बिनसले असल्याचे चित्र दिसू लागले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) आज महत्त्वाचा कार्यक्रम होता. चार प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मात्र कार्यक्रम पत्रिकेत नाव असतानाही शिंदे यांनी दांडी मारली. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

एमएमआरडीएने उभारलेल्या सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2, चेंबूर मेट्रो स्थानक, डॉ. बाबासाहेब भोसले उड्डाणपुलाचे लोकार्पण तसेच ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा रस्ता प्रकल्पासाठी अर्जुना टीबीएमचे लाँचिंग मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. सह्याद्री अतिथीगृह येथे ऑनलाइन पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते. मात्र शिंदे या कार्यक्रमाला अचानक गैरहजर राहिले. यामुळे सत्ताधाऱयांमधील बेबनाव असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचे, यावर आज सुनावणी होती. त्यासाठी शिंदे यांनी हा कार्यक्रम टाळला असावा किंवा आमदार भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री म्हणून 13 ऑगस्टला जाहीर करतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने त्यांनी गैरहजर राहून नाराजी व्यक्त केली अशी चर्चा सुरू झाली आहे.