
ओला, उबर, रॅपिडोसारख्या कॅब सेवा देणाऱ्या अॅपचा वापर करणाऱ्या प्रवाशांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राईड पूर्ण होण्यापूर्वीच अॅपच्या स्क्रिनवर दाखवले जाणारे टिप देण्याचे प्रॉम्प्ट किंवा इंटरफेस फीचर्स काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अतिरिक्त पैसे दिल्यास चांगली सेवा मिळू शकते, असा गैरसमज यातून निर्माण होऊ शकतो. टीप देण्याचा पर्याय हा राईड पूर्ण झाल्यानंतरच देता येऊ शकतो, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.
मोटर व्हेईकल अॅग्रीगेटर गाईडलाईन्स, 2025 च्या कलम 14.15 चा संदर्भ देत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आपल्या निर्देशात म्हटले की, टीप देणे पूर्णपणे ऐच्छिक असेल आणि प्रवास पूर्ण झाल्यावरच ती देता येऊ शकेल. हा पर्याय बुकिंगच्या वेळी किंवा प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा प्रवासादरम्यान हा पर्याय देता येऊ शकत नाही. मंत्रालयाने सर्व अॅग्रीगेटर कंपन्यांना आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि मोबाईलवरील अॅप्सची पडताळणी करून असे फिचर्स तत्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. टीप देण्याच्या प्रक्रियेवर केंद्र सरकारने पूर्णपणे बंधन घातलेले नाही. तर त्यांनी केवळ याची पद्धत आणि ती मागण्याच्या वेळेत सुधारणा केली आहे. मोटर व्हेईकल अॅग्रीगेटर गाइडलाइन्सच्या नियमानुसार प्रवासी स्वच्छेने कॅब चालकाला टीप देऊ शकतो. मात्र हा पर्याय प्रवास संपल्यानंतरच उपलब्ध असावा, असे केंद्राचे म्हणणे आहे.






























































