
भिवंडी-पारोळ राज्य मार्गाचे नुकतेच काँक्रिटीकरण करण्यात आले असले तरी या रस्त्यावरील प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. रस्त्यावरील अनेक पुलांना संरक्षक कठडेच नसल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी करूनही प्रशासन ढिम्म असल्याने वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करत असाल तर वाहनचालकांनो, सावधान… अन्यथा थेट नदीत जाल, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
भिवंडी-पारोळ या रस्त्यावर अनेक ओढे, नाले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पूल उभारण्यात आले आहेत. मात्र हे पूल जुने तसेच जीर्ण अवस्थेत असून अनेक पुलांवरील संरक्षक कठडेच गायब झाले आहेत. या राज्य मार्गाचे नुकतेच काँक्रिटीकरण करण्यात आले असताना मात्र पुलांच्या संरक्षक कठड्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आल्याने वाहनचालकांचा प्रवास धोकादायक ठरत आहे. दरम्यान, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
जीव धोक्यात घालून प्रवास
या मार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. रात्रीच्या वेळेस पुलांवरील संरक्षक कठडे दिसत नसल्याने या मार्गावरील प्रवास धोकादायक ठरत आहे. त्यातच हा मार्ग छोटा असल्याने प्रवास करताना वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या दुरवस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
































































