
डोंबिवली एमआयडीसीतील धर्मवीर आनंद दिघे उद्यान गेल्या वर्षभरापासून कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून वारंवार बंद ठेवले जात आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय आणि चिमुकल्यांचा हिरमोड होत आहे. हे उद्यान नियमित खुले न केल्यास २६ ऑगस्टला उद्यानाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
२००२ मध्ये तत्कालीन शिवसेना नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांच्या प्रयत्नातून डोंबिवली एमआयडीसी परिसरात महापालिकेने धर्मवीर आनंद उद्यान उभारले. या उद्यानात जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळणी व विविध झाडे आहेत. उद्यानात नियमित ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारायला नेहमी येतात. तर लहान मुलेही खेळण्यासाठी येत असतात. मात्र हे उद्यान वारंवार बंद असल्यामुळे त्यांचा हिरमोड होत आहे. तसचे उद्यानात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. याबाबत स्थानिकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी विभागप्रमुख राजू नलावडे यांच्याकडे तक्रार केली. याची गंभीर दखल त्यांनी घेतली आणि पालिका अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला.
सुरक्षारक्षकाचा ठेका संपल्याने उद्यान वारंवार बंद ठेवण्यात येते, अशी माहिती समोर आली. या उद्यानाची नियमित साफसफाई, झाडांची निगा आणि सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारावर उघडण्याची व बंद करण्याची वेळ तसेच आवश्यक सूचना असलेला फलक लावावा, अशीही मागणी करण्यात येत आहे. याविरोधात धर्मवीर आनंद दिघे यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त २६ ऑगस्टला आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात स्थानिक सामाजिक संघटनाही सहभाग घेणार आहेत.































































