ठाण्याची पोलीस वसाहत चकाचक; शिवसेनेचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या ठाणे पोलिसांची वसाहत आता चकाचक झाली आहे. या वसाहतीमध्ये कचरा, झाडांचा पालापाचोळा व झावळ्याचे साम्राज्य पसरले होते. डासांच्या प्रादुर्भावामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. पोलीस पत्नी आणि स्थानिक नागरिकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी संपर्क साधून याबाबतची तक्रार केली. उपशहरप्रमुख सचिन चव्हाण यांनी तत्काळ यंत्रणा राबवत संपूर्ण पोलीस वसाहत कचरामुक्त केली. शिवसेनेच्या पुढाकाराने परिसर कचरामुक्त करण्यात आला.

प्रभाग क्रमांक २२ मध्ये जरीमरी मंदिराजवळ जुनी पोलीस वसाहत आहे. या वसाहतीमध्ये जवळपास १ हजार २०० पोलीस कर्मचारी कुटुंबियांसह राहत आहेत. वसाहतीमध्ये कचरा, झाडांचा पालापाचोळा व फांद्यांचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरून मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला होता. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढणार असल्याने पालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांना वारंवार सांगूनदेखील याकडे दुर्लक्ष केले जात होते, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

२ तासांत संपूर्ण परिसर कचरामुक्त

स्थानिक नागरिकांनी शिवसेनेचे स्थानिक उपशहरप्रमुख सचिन चव्हाण यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. यावेळी चव्हाण यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेला संपर्क केला. त्यानंतर तब्बल २ तासांत संपूर्ण परिसर कचरामुक्त करून घेतला. यावेळी स्थानिक शाखाप्रमुख प्रदीप घोसाळकर उपस्थित होते. परिसर स्वच्छ झाल्यामुळे पोलीस कुटुंबियांनी शिवसेनेचे आभार मानले.