Chamoli Tunnel Accident – अचानक स्फोट झाला अन् पाणी, चिखल बोगद्यात शिरला; 7 मजुरांचा करुण अंत, 14 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी येथे गुरुवारी सायंकाळी भीषण दुर्घटना घडली. टीएचडीसी प्रकल्पाच्या निर्माणाधीन हायड्रोलिक बोगद्यात अचानक मोठ्या प्रमाणावर पाणी आणि गाळ शिरल्याने बोगदा कोसळला. या दुर्दैवी घटनेत 7 कामगारांचा करुण अंत झाला असून 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. बोगद्यात अडकलेल्या 22 कामगारांपैकी 21 जणांचा शोध घेण्यात यश आले असून अजूनही 1 कामगार बोगद्याच्या आत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गुरुवारी सायंकाळी सुमारे 6.45 च्या सुमारास एचसीसी कंपनीद्वारे या बोगद्याचे काम सुरू होते. कामगार आत काम करत असताना अचानक प्रचंड वेगाने चिखल, पाणी आणि मातीचा ढिगारा बोगद्यात घुसला. कामगारांना बाहेर पडण्याची संधी मिळण्यापूर्वीच बोगद्याचा मार्ग बंद झाला आणि ते आत अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, एनडीआरएफ आणि ‘एसडीआरएफच्या तुकड्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

बोगद्यात मोठ्या प्रमाणावर पाणी आणि गाळ साचल्याने बचावकार्यात प्रचंड अडचणी येत आहेत. अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी एसडीआरएफच्या जवानांनी स्थानिक बनावटीच्या ड्रम बोटींचा वापर केला. बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढलेल्या 14 जखमी कामगारांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना उच्च वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या केंद्रांमध्ये हलवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तर काहींवर गोपेश्वर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बोगद्यात अजूनही अडकलेल्या एका कामगाराला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अवजड यंत्रसामग्रीच्या साहाय्याने चिखल हटवण्याचे आणि पाणी उपसण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे. बचावकार्यात एनडीआरएफ, एसडीआरएफ व्यतिरिक्त हिंदुस्थानी लष्कर, आयटीबीपी, सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिसांचे जवान संयुक्तपणे कार्यरत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी संपूर्ण बचावकार्यावर स्वतः लक्ष ठेवले आहे. बोगद्यात अडकलेल्या प्रत्येक कामगाराला सुरक्षित बाहेर काढणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सर्व यंत्रणांना युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नेमके काय घडले?

गुरुवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास बोगद्यात जवळपास 1.8 किलोमीटर आत असलेल्या एका पोकळीतून एकाएकी मोठ्या प्रमाणात पाणी, चिखल आणि मातीचा ढिगारा आला. बोगद्यात पॅकिंगचे काम सुरू होते त्यावेळी स्फोटासारखा आवाज झाला आणि पाण्यासोबत गाळ जमा होऊ लागला. त्यामुळे मजुरांची पळापळ सुरू झाली. बोगद्याचा मार्गच बंद झाल्याने आत अडकून अनेक मजुरांचा मृत्यू झाला.