
सांगली महापालिका क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या ५९२ कोटींच्या पूरनियंत्रण प्रकल्पावरून विरोधी पक्षनेत्यांनी थेट भाजप नेत्यांवर ‘टक्केवारी’चा आरोप केल्याने महासभेत प्रचंड गोंधळ निर्माण झाला. भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. भाजपकडून ‘जय श्रीराम, भाजपचा विजय असो’, तर काँग्रेसकडून ‘नहीं चलेगी… नहीं चलेगी, टक्केवारी नहीं चलेगी,’ अशा घोषणा दिल्याने वातावरण चांगलेच तापले. महापौर व काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकमेकांवर आरोप करत ‘टक्केवारी’च्या वादात शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर व काँग्रेस नेते खासदार विशाल पाटील यांना गोवले.
शहरातील ५९२ कोटींच्या प्रकल्पावरून महापालिकेची विशेष महासभा महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महासभेच्या सुरुवातीपासूनच अनेक नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. दर मान्यतेचा विषय स्थायी समितीसमोर न आणता परस्पर कार्यारंभ आदेश देण्याच्या हालचाली शासनस्तरावरून सुरू आहेत. पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी केला; तर अधिनियम बाजूला ठेवून प्रशासन हा प्रकल्प राबवत आहे. यातून महासभा, स्थायी समितीला का वगळताय? प्रशासनावर कोणाचा दबाव आहे काय, असा प्रश्न संतोष पाटील यांनी उपस्थित केला.
विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण म्हणाले, “या प्रकल्पासाठी १४ ठिकाणचे भूसंपादन करावे लागणार आहे; पण ते गांभीर्याने घेतले जात नाही. प्रशासनाकडून चुकीची उत्तरे दिली जातात. ‘एमआरडीपी’ची सध्या सुरू असलेली प्रक्रिया शासनातील कोणत्यातरी सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून चालली आहे.” या वेळी भाजपने हा प्रकल्प टक्केवारीसाठी आणला असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर महापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासह भाजप नगरसेवकांनी हरकत घेतली. “भाजपचे नाव घ्यायचे नाही, खाली बसा,” असे भाजप नगरसेवकांनी सुनावले. त्यातून भाजप व काँग्रेस नगरसेवक आमने-सामने आले. “विरोधी पक्षनेत्यांनी माफी मागावी, भाजप नेत्यांवरील टक्केवारीचा आरोप मागे घ्यावा,” अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली.
काँग्रेसकडून मंगेश चव्हाण, राजेश नाईक, संजय मेंढे, फिरोज पठाण, मयूर पाटील, बिलकिस बुजरूक, सलमा शिकलगार यांच्यासह अन्य नगरसेवक, तर भाजपकडून सभागृह नेते संदीप आवटी, निरंजन आवटी, विश्वजित पाटील, दरिबा बंडगर, लक्ष्मण नवलाई, रोहिणी पाटील, योगिता राठोड, केदार खाडीलकर, मोहन वाटवे, प्रकाश पाटील घोषणाबाजीत आघाडीवर होते. या वेळी एकमेकांच्या पक्षाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
“विरोधी पक्षनेते जोपर्यंत माफी मागणार नाहीत, तोपर्यंत महासभेचे कामकाज सुरू होणार नाही. टक्केवारीचे पुरावे आहेत का?” असा सवालही महापौरांनी केला. त्यावर, “होय, पुरावे घेऊन आलोय,” असे चव्हाण म्हणाले. “टक्केवारीचा आरोप मागे घेणार नाही आणि माफीही मागणार नाही,” असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यानंतर वाद वाढत जाऊन दोन्हीकडचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावले.
काँग्रेस व भाजपची मिलीभगत असून सभा गुंडाळण्यासाठी हा वाद सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी केला. तेवढ्यात “मंगेश चव्हाण हे बागवान यांच्यावर चालून का गेले?” असा सवाल करत उपमहापौर मगदूम हे व्यासपीठावरून उतरून खाली आले. सभागृहात वाद व घोषणाबाजी सुरूच होती. तेवढ्यात भाजपचे निरंजन आवटी म्हणाले, “जिल्हाधिकारी कार्यालयात एमआरडीपीचे सादरीकरण झाले, त्या वेळी खासदार विशाल पाटील हेही होते; मग त्यांनीही टक्केवारी घेतली काय?” यावरून पुन्हा भाजप व काँग्रेस नगरसेवकांमध्ये वाद रंगला. “चव्हाण यांनी माफी मागितल्याशिवाय सभेचे कामकाज सुरू होणार नाही,” असा पवित्रा महापौर व भाजप नगरसेवकांनी कायम ठेवला. दरम्यान, “मी बोललेले काही चुकीचे वाटत असेल, तर ते शब्द सभा कामकाजातून काढून टाकावेत,” असे चव्हाण यांनी सांगितले. त्यानंतर वादावर पडदा पडला.
महापौर – युवराज बावडेकर यांच्यात चकमक
शिंदे गटाचे नगरसेवक युवराज बावडेकर यांनीदेखील काँग्रेसच्या भूमिकेला साथ दिली. त्यावर महापौर सूर्यवंशी संतप्त झाले. “सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील एमआरडीपीसंदर्भातील समितीचे अध्यक्ष शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर आहेत. मग त्यांनीही टक्केवारी घेतली असे म्हणायचे काय?” असे म्हणताच बावडेकर संतापले. “आम्हालाही बरेच काही माहिती आहे. मिरज शासकीय विश्रामगृहावर तुम्हा तिघांना बोलावून कोणी काय सांगितले हे सर्व माहिती आहे,” असे बावडेकर यांनी सुनावले.
































































