
राज्य शिक्षण संचालनालयाने (प्राथमिक तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक) शालार्थ प्रणालीतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली आहे. त्यानुसार, अनुदानित, खाजगी अनुदानित आणि जिल्हा परिषदांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शालार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी लागेल; अन्यथा ऑगस्ट, सप्टेंबरचा पगार मिळणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.
शालार्थ प्रणालीतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. ऑगस्ट २०२५ आणि सप्टेंबर २०२६ चे वेतन अदा करण्यापूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन वितरित केले जाणार नसल्याचा इशाराही शिक्षण संचालनालयाने दिला आहे.
शिक्षण संचालनालयाने काढलेल्या आदेशानुसार वित्त विभागाच्या यापूर्वीच्या शासन परिपत्रकांचा तसेच प्रधान सचिव, वित्त विभाग यांनी २८ जुलै २०२६ रोजी झालेल्या आढावा बैठकीत दिलेल्या सूचनांचा संदर्भ देण्यात आला आहे. याआधीही ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, अद्याप अनेक कर्मचाऱ्यांची प्रक्रिया अपूर्ण असल्याने आता कठोर भूमिका घेण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांच्या सहीने ही आदेशाची प्रत काढण्यात आली आहे.






























































