
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्याला रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सिंधुदुर्गातील वैभववाडी रेल्वे स्थानकात आणखी तीन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर केला आहे. तसेच तेजस आणि जनशताब्दीसह अन्य चार एक्स्प्रेस गाड्यांना वैभववाडीत थांबा देण्याच्या शक्यतेची पडताळणी केली जात आहे.
वैभववाडी आणि कणकवली स्थानकांवरील पायाभूत सुविधांच्या मागण्यांबाबत शिवसेना नेते व खासदार अरविंद सावंत यांनी कोकण रेल्वे प्रशासनाला पत्र दिले होते.
खासदार अरविंद सावंत यांच्या पत्राची दखल घेत प्रशासनाने वांद्रे टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस, सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस आणि एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस या गाड्यांना वैभववाडीत थांबा देण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. याशिवाय तेजस, जनशताब्दी, नेत्रावती आणि एलटीटी-मंगळुरू एक्स्प्रेस या गाड्यांनाही थांबा देण्याबाबत चाचपणी केली जात आहे.































































