आदर्श विद्या मंदिर शाळेचे होणार स्थलांतर; उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाळीवेस येथील आदर्श विद्या मंदिराच्या मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीचा प्रश्न अखेर उच्च न्यायालयाच्या दारात पोहोचला आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे संभाव्य जीवितहानी टळण्याबरोबरच शाळेच्या स्थलांतराचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत ॲड. विकासराव देवकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

आदर्श विद्या मंदिरात सन १९५२ पासून प्राथमिक व माध्यमिक विभागाचे वर्ग जुन्या इमारतीत सुरू आहेत. महापालिकेने पाहणी केल्यानंतर ही इमारत मोडकळीस आलेली असून, शाळा चालवण्यासाठी धोकादायक असल्याचा अभिप्राय नोंदवला होता. त्यामुळे इमारत खाली करून शाळा अन्यत्र स्थलांतरित करण्याची सूचना करण्यात आली होती. शाळा व्यवस्थापनाने यासाठी शासनाकडे प्रस्तावही सादर केला. मात्र, तो दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने स्थलांतर रखडले.

या पार्श्वभूमीवर शाळेने सुरक्षित जागेवर स्थलांतर करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली. ५ ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती मिलिंद एन. जाधव व न्यायमूर्ती मंदार एस. देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ऑनलाइन सुनावणीस उपस्थित होते. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना कोणताही धोका होऊ नये, यासाठी स्थलांतराची तातडीने कार्यवाही करण्यास दोन्ही अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली.

अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेत १३ विद्यार्थी व दोन शिक्षक जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर धोकादायक शाळा इमारतींबाबत वेळीच उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे देवकर यांनी सांगितले. या प्रकरणात शाळेतर्फे ॲड. विकासराव देवकर व ॲड. रंजना देवकर यांनी काम पाहिले. प्रशासनाच्या निदर्शनास योग्य वेळी बाब आणून दिल्यास संभाव्य जीवितहानी व नुकसान टाळता येऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.