मुंबईच्या जलवाहिनीला ठाण्यात मोठी गळती, पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाण्यातील तीन हात नाका परिसरात पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या तीन हजार मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी ही महत्त्वाची जलवाहिनी असल्याने मुंबई परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जलवाहिनी सुमारे ३ ते ४ मीटर खोलीवर असल्याने गळती दुरुस्ती करण्याचे काम तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे. गळतीची माहिती मिळताच मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन पातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

जलवाहिनीपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून गळतीचा स्रोत शोधणे आणि जलवाहिनीची दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी कार्यरत असून, दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.