
मणिपूरला नागालँड आणि आसामशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग सर्व समुदायांसाठी खुला करण्याची घोषणा राज्य सरकारने केली. ही घोषणा केल्यानंतर काही दिवसांतच मणिपूरमधील हिंसाचार वाढला आहे. राजधानी इम्फाळपासून 45 किमी अंतरावर असलेल्या मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात एकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, कुकी-बहुल असलेल्या या जिल्ह्यातील लांका नागा गावात शुक्रवारी सकाळी 8 वाजता हा हल्ला झाला. हल्ला झाला तेव्हा पीडित व्यक्ती शेतात काम करत होत्या. या हल्ल्यात अन्य तीन जण जखमी झाले आहेत. जखमी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवली आहे.
विरिलीआंगबू चावांग (34) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर काविदिनांग अबोनमाई (55), मालियांगजिनिनांग अबोनमाई (52) आणि नामथिउलुंगबू प्रिमाई (50) अशी जखमींची नावे आहेत. हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही. या हल्ल्यामुळे लांका नागा परिसरातील सुरक्षेबाबत पुन्हा चिंता निर्माण झाली आहे.




























































