
जम्मू आणि कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी सिंधू जल करार स्थगित ठेवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. या करारामुळे जम्मू-कश्मीरच्या लोकांना स्वतःच्याच हक्काच्या जलसंपत्तीचा वापर करण्यावर निर्बंध आले असून, एकप्रकारे आमचे प्राणच हिरावले गेले आहेत, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. याचवेळी कश्मिरी जनतेबद्दल खोटा कळवळा दाखवणाऱ्या पाकिस्तानलाही त्यांनी चांगलेच सुनावले आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, “या नद्या आमच्या आहेत आणि त्यांच्या पाण्यावर आमचाच पहिला हक्क आहे. पाकिस्तान नेहमी स्वतःला काश्मिरी जनतेचा खूप मोठा हितचिंतक आणि सहानुभूतीदार असल्याचे भासवतो. पण जेव्हा पाण्याचा प्रश्न येतो तेव्हा त्यांची ही सहानुभूती कुठल्या कुठे गायब होते.” या कराराचा आजवर सर्वात मोठा फटका जम्मू-कश्मीरलाच बसला असून, नद्यांचे पाणी वापरण्याचे आमचे अधिकार हिरावून घेतले जात असताना पाकिस्तानची सहानुभूती कुठे गेली होती, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही आमच्याच पाण्याचा योग्य वापर करू शकू, यासाठी सिंधू पाणी वाटप करार निलंबितच राहायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सिंधू पाणी वाटप करार तात्पुरता स्थगित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला खतपाणी घालणे पूर्णपणे थांबवत नाही, तोपर्यंत १९६० चा हा करार निलंबित राहील, असे हिंदुस्थानने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सिंधू नदीवर अवलंबून असलेल्या पाकिस्तानला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.





























































