राज्यातील 1949 अधिकारी, अंमलदारांना उत्कृष्ट सेवेबद्दल पदक जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एक हजार 949 पोलीस अधिकारी, अंमलदारांना त्यांनी आजवर केलेल्या उत्कृष्ट कामाचे फळ मिळाले. केंद्रीय गृह विभागाकडून देण्यात येणारे अति उत्कृष्ट सेवा व उत्कृष्ट सेवेबद्दल पदक जाहीर झाले आहे.

केंद्रीय गृह विभागाने पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या दीर्घकालीन व निष्कलंक सेवेची दखल घेत त्यांना अति उत्कृष्ट व उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याचे घोषित करत ही पदके देण्याचे अधिकार राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. त्यानुसार राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी आज राज्यातील एक हजार 949  अधिकारी व अंमलदारांना अति उत्कृष्ट व उत्कृष्ट सेवेसाठी पदके जाहीर केली. तब्बल एक हजार 189 अधिकारी, कर्मचाऱ्यांना अति उत्कृष्ट सेवेसाठी तर 760 अधिकारी, अंमलदारांना उत्कृष्ट सेवेसाठी पदके जाहीर केली आहेत.

13 अग्निशमन जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक

गेल्या वर्षी म्हैसूर कॉलनी येथे मोनोरेल बंद पडून अडकलेल्या 582 प्रवाशांची सुटका केल्याच्या कामगिरीची दखल घेत मुंबई अग्निशमन दलाच्या 13 अधिकारी-जवानांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक जाहीर झाले आहे. यात मुख्य अग्निशमन दल प्रमुख रवींद्र अंबुलगेकर, उपप्रमुख अनिल परब, विभागीय अधिकारी एम.व्ही. सावंत, वरिष्ठ केंद्र अधिकारी आय.के. कांबळे, केंद्र अधिकारी वाय.एच. पवार, डी.ए. भोसले, राजेश राणे व महेश गुडुलकर, रमेश कोळी, हर्षल कटके, चिंतामणी खांडेकर, विकी सरवदे, सुदर्शन पावडे यांचा समावेश आहे.