जनगणना जातनिहायच; बँक खाती किती, कोविड लस कुठे घेतली… 40 प्रश्न विचारणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुढील वर्षी देशात जनगणना होणार असून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदा जनगणनेत प्रथमच नागरिकांना त्यांची जात विचारण्यात येणार आहे. जनगणनेसाठी विचारण्यात येणारे 40 प्रश्न केंद्र सरकारने प्रसिद्ध केले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने आज एक अधिसूचना जारी केली असून त्यात जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची माहिती देण्यात आली आहे. जातीच्या नोंदीशिवाय कोविड लस कुठे घेतली आणि तुमच्याकडे किती बँक खाती आहेत, यासारखी माहितीदेखील विचारण्यात येणार आहे. या टप्प्याला फेब्रुवारी 2027 मध्ये सुरुवात होणार आहे.

जनगणनेत नागरिकांचे नाव, रोजगार, धर्म, भाषा, अपत्यांची संख्या, मोबाईल क्रमांक, आधार, पासपोर्ट क्रमांक इत्यादी वैयक्तिक माहिती विचारण्यात येणार आहे. प्रश्नावली 5 टप्प्यात विभागली आहे. तुमची ओळख आणि कुटुंब, शिक्षण आणि भाषा, रोजगार, जन्म आणि स्थलांतर तसेच इतर माहिती, असे पाच टप्पे आहेत. इतर माहितीमध्ये मतदार ओळखपत्र क्रमांक आणि वाहनचालक परवाना उपलब्ध आहे की नाही, हे प्रश्नदेखील विचारण्यात येणार आहेत. नागरिकांनी दिलेली वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

ओळख आणि कुटुंब ः यात एकूण 12 प्रश्न आहेत. त्यात नाव, कुटुंब प्रमुखाशी नाते, जन्मतारीख, वय, वैवाहिक स्थिती, लग्नाच्या वेळी असलेले वय, जोडीदाराचे नाव, नागरिकत्व, धर्म, जाती तसेच आईवडिलांची माहिती विचारण्यात येईल.

शिक्षण आणि भाषा  – या टप्प्यात तुमचे शिक्षण आणि डिजिटल साक्षरतेची माहिती घेण्यात येईल. याशिवाय अपंगत्व, मातृभाषा व इतर भाषा, शैक्षणिक संस्थेतील स्थिती, तुम्ही घेतलेले सर्वोच्च शिक्षण ही माहिती विचारण्यात येणार आहे.

रोजगार ः तुमच्या नोकरी किंवा रोजगाराबाबत 8 प्रश्नांमध्ये माहिती विचारण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात व्यक्तीने काम केले आहे की नाही, आर्थिक उलाढाल, व्यवसाय आणि कामाचे क्षेत्र, कामगाराची श्रेणी, बिगर आर्थिक कार्य, कामाच्या ठिकाणी कसे जाता याबाबत माहिती नोंदविण्यात येईल.

जन्म आणि स्थलांतर

तुमच्या जन्मस्थानासोबतच मुलांची तसेच स्थालांतर केले आहे की नाही, इत्यादी माहिती विचारण्यात येणार आहे. तुमचे जन्मस्थान, मागील निवासस्थान, स्थलांतराचे कारण, तेथे राहण्याचा कालावधी तसेच स्थायी निवासस्थानाचा पत्ता नोंदविण्यात येईल. महिलांना मुलांबाबत माहिती विचारण्यात येईल.

दोन टप्प्यांत होणार जनगणना

जनगणना दोन टप्प्यात होणार असून एप्रिल ते सप्टेंबर 2026 या पहिल्या टप्प्यात घरांची मोजणी होणार आहे. तर दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार आहे. या टप्प्यात कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती नोंदवतील. लडाख, जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हा टप्पा सप्टेंबर 2026 मध्येच होणार आहे. कर्मचारी घराघरांत जाऊन माहिती गोळा करण्यास सुरुवात करण्यापूर्वी नागरिकांना स्वयं-गणना करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. नागरिक 17 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत स्वतःहून ऑनलाईन पद्धतीने आपली व आपल्या कुटुंबाची माहिती भरू शकतील.