
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेच्या ऐतिहासिक पराक्रमाला 360 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे 17 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता एम.जी. रोड, सुरसंदन, आग्रा येथे विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण आणि स्वराज्याच्या विचारांचा जागर करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेला 360 वर्षे तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाला 125 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ गौरवाने सांगण्याचा विषय नसून तो अभ्यासण्याचा, समजून घेण्याचा आणि सत्य व संदर्भांसह पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा राष्ट्रीय वारसा आहे. म्हणूनच आग्रा सुटकेच्या या ऐतिहासिक घटनेकडे केवळ उत्सव म्हणून न पाहता, तिच्यामागील इतिहास, दस्तऐवज, स्वराज्याची राजकीय पार्श्वभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची असामान्य निर्णयक्षमता नव्या पिढीसमोर मांडावी, असे आवाहन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप, सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे-पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, मुंबई कोषाध्यक्ष अनंत मोरे, मुंबई अध्यक्ष अविनाश राणे आणि मुंबई सरचिटणीस बाळकृष्ण लाड यांनी केले आहे.



























































