गणेशोत्सव मंडळांना आता पाच वर्षांची मंडप परवानगी; ऑनलाइन नोंदणी सुरू, 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सार्वजनिक किंवा खासगी जागेवर 2025 मध्ये एका वर्षासाठी गणेशोत्सव मंडप उभारण्याची परवानगी घेतलेल्या मंडळांना यावर्षी 2030 पर्यंत म्हणजे पुढील पाच वर्षांसाठी मंडप परवानगी घेता येणार आहे. यासाठी विभागा कार्यालयात अर्ज करता येणार आहे. या अर्जांची तपासणी केल्यानंतर स्थानिक पोलीस व वाहतूक पोलिसांकडून ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र प्राप्त करता येईल. यानंतर 100 रुपये शुल्क भरून विभाग स्तरावर मंडळांना परवानगी देण्यात येणार आहे.

गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी दरवर्षी पालिकेकडून परवानगी घ्यावी लागते. यामध्ये न्यायालयाने आणि पालिकेने निर्धारित नियमांचे पालन करण्याबाबत प्रतिज्ञापत्रही सादर करावे लागते. यानुसार आजपासून पालिकेने मंडळांना ऑनलाइन मंडप परवानगीची ‘एक खिडकी’ सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

दोन स्वयंसेवकांचे प्रशिक्षण आवश्यक

गणेशोत्सवात मंडपाच्या ठिकाणी सुव्यवस्था राखण्यासाठी गर्दीचे नियोजन, अग्निसुरक्षा, प्रथमोपचार आदी विषयांबाबत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा विभाग कार्यालयाच्या स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे दोन स्वयंसेवक उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मंडप परवानगी 26 सप्टेंबरपर्यंत वैध

  • विभाग कार्यालयामार्फत संबंधित जागेचे स्थळ व क्षेत्रफळ हे मंजूर परवानगीनुसार असल्याची प्रत्यक्ष खातरजमा करण्यात येईल. त्यानंतर संगणकीय प्रणालीद्वारे स्थानिक पोलीस व वाहतूक पोलिसांकडून ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र प्राप्त केले जाईल.
  • गणेशोत्सव मंडप परवानगीची वैधता 26 सप्टेंबरपर्यंत राहणार  आहे. तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी दिनांक 10 सप्टेंबर ते दिनांक 10 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. नवरात्रोत्सवासाठी मंडप परवानगी वैधता 21 ऑक्टोबर राहील.