कुर्ला येथे क्रेन कोसळली; 10 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुर्ला पूर्वेतील इंदिरानगर भागात ‘एमएमआरडीए’ इमारत पाडकामासाठी क्रेनच्या सहाय्याने जेसीबी नेत असताना क्रेन झोपडय़ांवर कोसळून 10 जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. जखमींमधील आठ जणांवर पालिकेच्या शीव रुग्णालयात तर दोन जणांवर कुर्ला भाभा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

शुक्रवारी पहाटे 3.4 वाजता बंटारा भवन, म्हाडा इमारत, गॅलेक्सी अपार्टमेंटच्या मागील बाजूला हायड्रोलिक क्रेनच्या सहाय्याने जेसीबी नेण्यात येत असताना ही दुर्घटना घडली. 17 मजली इमारतीच्या पाडकामासाठी जेसीबी नेण्यात येत होता. यावेळी क्रेनचा काही भाग कोसळून जवळच्याच रेल्वेच्या उच्च दाबाच्या ओव्हरहेड वायर आणि कुरेशीनगरमधील झोपडपट्टय़ांवर कोसळला. यावेळी सम्राट अशोकनगर रस्त्यालगतचा परिसर, म्हाडा इमारतीची संरक्षक भिंत आणि म्हाडा इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या तीन ते चार वाहनांचेही नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पालिकेचे अग्निशमन दल, पोलिसांनी बचावकार्य केले. दरम्यान, क्रेन अपघातप्रकरणी पंत्राटदार व चालकावर चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.