
राज्यातील महायुती सरकारने आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाबरोबरच गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवासी गणेशभक्तांची ‘गंडवागंडवी’ केली आहे. एसटीची लागोपाठ दोनदा भाडेवाढ जाहीर केल्यामुळे प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यानंतर शुक्रवारी ग्रुप बुकिंगची ३० टक्क्यांची भाडेवाढ रद्द केली. मात्र, आधी जाहीर केलेली १३.५६ टक्क्यांची कायमस्वरूपी भाडेवाढ ‘जैसे थे’ ठेवण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्यांचा एसटी प्रवास महागच राहणार असल्याने सरकारच्या फसव्या भूमिकेविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
एसटी महामंडळाला आर्थिक मदत करण्याच्या कामात महायुती सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे. अर्थ खात्याने थेट महामंडळाला पत्र लिहून आर्थिक मदत देण्यास नकारघंटा वाजवली आणि एसटीला स्वतःच कर्मचाऱ्यांच्या वेतन व इतर खर्चाचा भार उचलण्याचे फर्मान काढले. त्यामुळे एसटीची आर्थिक घडी कोलमडली आहे. अशा स्थितीत जुलैमध्ये १३.५६ टक्क्यांची कायमस्वरूपी भाडेवाढ लादण्यात आली. त्यात भर म्हणून गणेशोत्सवातील ग्रुप बुकिंगवर ३० टक्क्यांची भाडेवाढ लागू केली होती. त्याला कोकणवासीय गणेशभक्त प्रवासी संघासह इतर गणेशभक्तांनी तीव्र विरोध केला होता. त्या विरोधानंतर सरकारने शुक्रवारी एकेरी गट आरक्षणावरील (ग्रुप बुकिंग) ३० टक्क्यांची भाडेवाढ मागे घेत असल्याचे जाहीर केले.
श्रेय लाटण्याचा प्रकार आधी भाडेवाढ लादून नंतर ती मागे घेण्याचे श्रेय लाटण्याचा प्रकार सरकारकडून झाल्याने गणेशभक्तांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सरकारच्याच निष्क्रिय धोरणामुळे यंदा एसटीच्या सर्व गाड्यांसाठी १३.५६ टक्के जास्त पैसे मोजावे लागणार असल्याची नाराजी कोकणात जाणारे गणेशभक्त व इतर प्रवासी व्यक्त करत आहेत.






























































