दहा शिट्ट्या करूनही वाटाणा शिजेना! अंगणवाडीच्या पोषण आहाराची पोलखोल करणाऱ्या सेविकेचे निलंबन, कारवाईविरोधात संताप व्यक्त होताच ‘झेडपी’कडून निलंबन मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंगणवाडीच्या चिमुकल्यांना पोषण आहारात दिला जाणारा वाटाणा दहा-दहा शिट्टय़ा करूनही शिजत नाही, अशी तक्रार सोशल मीडियावर केली म्हणून सेविकेला निलंबित केल्याचा प्रकार आंबेगाव तालुक्यात घडला. प्रशासनाच्या ‘उल्टा चोर कोतवाल को डाँटे’ या कारभाराविरोधात सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर या सेविकेचे निलंबन तात्काळ मागे घेण्यात आले.

अंगणवाडीतील सेविका देवयानी (रेश्मा) पारधी यांनी अंगणवाडीतील लहान मुलांना आणि गरोदर मातांना दिला जाणारा निकृष्ट पोषण आहाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत प्रशासनाचे वाभाडे काढले. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अंगणवाडय़ांना पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जाकडेही लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी व्हिडिओतून केली होती. निकृष्ट आहाराचा पर्दाफाश झाल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची कोणतीही चौकशी न करता तक्रार करणाऱ्या सेविकेचे निलंबन केले. मात्र या कारवाईविरोधात तीव्र पडसाद उमटल्यानंतर निलंबन मागे घेण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारच्या या तुघलकी निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला. देवयानी पारधी यांचे निलंबन तातडीने मागे घेऊन या निकृष्ट आहार प्रकरणाची दहा दिवसांत चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली.

कोणतीही चौकशी न करता प्रशासनाने घाईगडबडीत या अंगणवाडी सेविकेचे निलंबन केले होते. हे अन्यायकारक निलंबन तत्काळ मागे घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्यानंतर निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे.

विरधवल जगदाळे, अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद