
राज्यातील नागरिकांना खराब अन्नपदार्थ खाऊ घालणाऱयांच्या मागे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा बडगा कायम आहे. आज मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएने मुंबईसह राज्यभरात 22 ठिकाणी धाडी घातल्या. या धाडींमध्ये मुंबईतील रेडिओ क्लब, स्टेटस रेस्टॉरण्ट, खार जिमखान्यासह 7 हॉटेलांचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे. अस्वच्छ कपडय़ांतील स्वयंपाकी आणि स्वयंपाकघरात शाकाहारी व मांसाहारी पदार्थ एकत्र ठेवणे आदी कारणांस्तव ही कारवाई करण्यात आली.
कुलाबा येथील प्रसिद्ध बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब लिमिटेड आस्थापनेची एफडीएने तपासणी केली तेव्हा स्वयंपाकघरात अन्नपदार्थांवर माश्यांचा वावर दिसून आला. वॉशिंग पावडर व अन्य रसायने अन्नपदार्थांजवळ ठेवली गेली होती. स्टोव्हजवळ कचऱयाचा डबा होता आणि स्वयंपाकघरात थुंकल्याच्या खुणा आढळल्या. त्यामुळे रेडिओ क्लबचा अन्न व्यवसाय परवाना तत्काळ निलंबित केला गेला. कुलाब्यातील मॅक्डोनाल्ड समूहातील हार्डपॅसल रेस्टॉरण्टमध्ये किचनमध्ये जिवंत झुरळे फिरत होती आणि आचाऱयांनी बारदानांनी लादी पुसल्यानंतर हात न धुता अन्नपदार्थ हाताळल्याचे पॅमेऱयात क्लिक झाले. त्यामुळे या आस्थापनाचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला. मालाडच्या इनजिनियस किचन्सने (नोवारा) अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे परवाना निलंबनाची कारवाई केली गेली.
राज्यभरात 13 हॉटेल्सना दणका
राज्यातील 89 हॉटेल्स, रेस्टॉरण्ट्स आणि धाब्यांची तपासणी आज एफडीएने केली. त्यातील 71 आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली असून 13 आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले. 902 लिटर भेसळयुक्त दूध आणि 2300 किलो दूध पावडरही जप्त केली गेली. गुटखा, पानमसाला विक्री करणाऱया 18 जणांना अटक करून 14 लाख 55 हजार 339 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.





























































