
कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर राजस्थानातील जयपूर जिल्ह्यात हल्ला झाला. एका गोठय़ात सुरू असलेल्या सरकारी प्राथमिक शाळेची पाहणी करण्यासाठी आशुतोष रांका व काही सहकारी पोहोचले होते, मात्र गावकऱ्यांनी त्यांना विरोध करत हल्ला केला तसेच त्यांच्या वाहनांवर दगडफेकदेखील केली. हा हल्ला भाजपच्या इशाऱ्यावरून झाल्याचा आरोप रांका यांनी केला आहे.
जयपूर जिल्ह्यातील रामपुरा येथील शाळेची पाहणी करण्यासाठी रांका यांच्या नेतृत्वाखाली सीजेपीचे काही कार्यकर्ते गेले होते. शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. त्यामुळे 50 मीटर अंतरावर एका जागेत शाळा हलविण्यात आली आहे. ही जागा म्हणजे एक गोठा असून तेथे पत्र्याच्या तात्पुरत्या छताखाली शाळा भरते. या शाळेची पाहणी करण्यासाठी आशुतोष रांका हे सीजेपीच्या कार्यकर्त्यांसोबत तेथे गेले होते, मात्र गावकऱ्यांनी त्यांना विरोध केला आणि मारहाण केली. सीजेपीचे कार्यकर्ते पोहोचण्याआधीच गावकरी रस्त्यावर उभे होते. त्यांनी सीजेपीच्या कार्यकर्त्यांना गावात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी गावकरी रस्ता अडवून बसले. त्यानंतर कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात रांका यांचा शर्ट फाडण्यात आला, दगडफेक करण्यात आली. महिला कार्यकर्त्यांवर चिखल फेकला. वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.
काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी म्हटले आहे की, विद्यार्थी सुरक्षेच्या नावाखाली सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, शाळांची प्रत्यक्ष स्थिती उघड होऊ नये, हाच या सरकारी आदेशामागचा स्पष्ट उद्देश दिसून येतो, असे पायलट म्हणाले.
भाजपने हल्ला घडवून आणला – रांका
आशुतोष रांका यांनी हा हल्ला भाजपने घडवून आणल्याचा आरोप केला. ते म्हणाले, राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आला. आम्ही 48 तासांचा अल्टिमेटम देत आहोत. हल्लेखोरांना अटक झाली पाहिजे. तसेच शाळांच्या पाहणीवर बंदी घालणारा आदेश मागे घ्या, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करून दिलावर यांच्या राजीनाम्याची मागणी करू, असे रांका म्हणाले.
…तर मी जयपूरला जाणार – दीपके
सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी हल्ल्याचा निषेध करताना सांगितले की, मुलांना एका गोठय़ात शिकवले जात होते. आशुतोष ही बाब उघडकीस आणणार होते. पुढील 48 तासांत शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही आणि त्या गुंडांना अटक केली गेली नाही, तर मी जयपूरला येईन आणि आवश्यक दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत शाळेबाहेर धरणे धरून बसेन, असा इशारा दीपके यांनी दिला.
अडीच वर्षांपासून गोठय़ात भरते शाळा
ही शाळा अडीच वर्षांपासून सुरू आहे. पूर्वी ही जागा गोठा होती. आता तिथे खोल्या बांधल्या आहेत. शाळेच्या छताच्या स्लॅबला तडे गेले आहेत. स्लॅब कधीही कोसळू शकतो. सरकार याकडे अजिबात लक्ष देत नाही, असा आरोप काही गावकऱ्यांनी केला आहे.





























































