80 टक्के समाजकारणामुळे शिवसेना वादळातही टिकून; खासदार संजय राऊत यांचे परखड मत, ‘उद्धव श्री’ पुरस्कारांचे वितरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पिंपरी शहराची खरी ओळख ही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्यांमुळे होत असते. कामगार, वैद्यकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रांमध्ये शिवसेना गेल्या ६० वर्षापासून काम करत आहे. राज्यात आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर ही संकल्पना शिवसेनेच्या स्थापनेनंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आणली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे शिवसेनेचे धोरण आहे. याच ८० टक्के समाजकारणावर अनेक वादळे, संकटामध्ये शिवसेना ६० वर्ष टिकून राहिली, असे परखड मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. तसेच ‘जिथे आग तेथे बंब’ असे समीकरण असते, त्याप्रमाणे ‘जिथे संकट तिथे शिवसेना’ हे धोरण पक्षाचे असल्याचेही राऊत म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘उद्धव श्री’ पुरस्कार वितरण सोहळ्यात खासदार संजय राऊत बोलत होते.

कलाक्षेत्रामध्ये स्वतः बाळासाहेब ठाकरे जगातील महान व्यंगचित्रकार, क्रीडा क्षेत्रामध्ये कबड्डी, खो-खो, या संदर्भातल्या अनेक स्पर्धा घेणे, क्रीडापटूंना मोठ्या मंचावर आणणे, मैदान निर्माण करणे, अशी कामे शिवसेनेच्या माध्यमातून सातत्याने कामे करण्यात येत असल्याचे सांगत खासदार संजय राऊत म्हणाले, मुंबईमध्ये मैदाने वाचावी म्हणून युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन सुरू आहे. राज्यातील सगळ्यात मोठी कामगार संघटना ही शिवसेनेची ‘भारतीय कामगार सेना’ असून, सामाजिक, साहित्य क्षेत्रामध्ये अगती विद्यार्थ्यांपासून आयएएस काहीजण फक्त राजकारण करतात. निवडणुका आल्या की पैसे वाटायचे, आश्वासनं द्यायची, खोटे बोलायचे, ईव्हीएम ताब्यात घ्यायचे, अचानक लाडक्या बहिणींविषयी प्रेम निर्माण करायचे; परंतु, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अशा प्रकारची चुकीची कामे कधी केली नाहीत. काम करतोय आणि मत मागतोय, असेही राऊत यांनी ठासून सांगितले.

खासदार संजय राऊत म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. त्या अडीच वर्षांपैकी किमान दोन वर्षे कोरोनाचे भयंकर संकट होते. देशातली परिस्थिती किती गंभीर आणि चिंताजनक होती; परंतु, मुख्यमंत्री ठाकरे यांनी हे राज्य एखाद्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे सांभाळले. बाजूच्या उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेतं तरंगत होती, गुजरातमध्ये स्मशानात जागा मिळत नव्हती, आठ आठ दिवस रांगा लागल्या होत्या, अशा अत्यंत चिंताजनक परिस्थितीमध्ये ठाकरे यांनी राज्याचे नेतृत्व केले. त्यांच्या नावाचा हा पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे.

सामाजिक कार्याला राजाश्रयाशिवाय प्रतिष्ठा नाही

शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक कार्याची, राजकीय कार्याचे सोहळे यापुढेही कायम सुरू ठेवावेत. त्याउलट असे सोहळे अधिक व्हायला पाहिजेत. क्रीडा, सामाजिक, साहित्य, कामगार क्षेत्रामध्ये जेवढे राजकीय पक्षाचे योगदान असायला पाहिजे. शेवटी राजाश्रय असल्याशिवाय सामाजिक कार्यालासुद्धा प्रतिष्ठा लाभत नसल्याचेही खासदार राऊत म्हणाले.

गद्दारांना गद्दारीचा युक्तिवाद नसतो

शिवसेनेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा दमदार युक्तिवाद झालेला आहे. आता फुटीर गटाचा युक्तिवाद होऊ शकत नाहीत. ते फुटीरच आहेत. गद्दारांना गद्दारीचा कोणताही युक्तिवाद नसतो. त्यांचेच म्हणणे मांडतील. आम्ही का शेण खाल्ले, कुठून शेण आणले, सुरतला, गुवाहाटीला किती शेण मिळाले, ते आम्ही कसे खाल्ले ते आता सगळे सांगतील. त्याचे ते समर्थन करतील, असा हल्लाबोल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना गद्दारांवर केला. ते म्हणाले, मुंबईतील काही नगरसेवकांचे जातप्रमाणपत्र रद्द करण्याचे जाणीवपूर्वक षडयंत्र रचले जात आहे. आमची संख्या कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाच्या २५ पेक्षा अधिक नगरसेवकांच्या जातप्रमाणपत्रावर आक्षेप आहे. मात्र, त्यांचे निर्णय होत नाहीत