
लोकल प्रवास सुखकर बनवण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) ठोस पावले उचलली आहेत. त्याअंतर्गत मध्य रेल्वेवरील तीन आणि पश्चिम रेल्वेवरील तीन अशा एकूण 6 कारशेडचा कायापालट करण्यात येणार आहे. लोकल गाडय़ांची प्रवासी क्षमता वाढवण्याच्या हेतूने कारशेडमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाची मोठी कामे एमआरव्हीसीने हाती घेतली आहेत.
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-3ए अंतर्गत ईएमयू कारशेडच्या विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणाची कामे केली जात आहेत. पश्चिम व मध्य रेल्वेवर सध्या 12 डब्यांच्या लोकलचे प्रमाण अधिक आहे. आता प्रवासी क्षमता वाढवण्याच्या हेतूने 15 डब्यांच्या लोकल चालवण्यासाठी कारशेडमधील विकासकामांचा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मध्य रेल्वेच्या कुर्ला, कळवा आणि सानपाडा कारशेडमध्ये विद्युत (सामान्य सेवा) कामेही हाती घेतली जात आहेत. या कामांचे एकत्रित कंत्राट मूल्य 40 कोटी रुपये आहे, तर पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल, कांदिवली आणि विरार कारशेडमध्ये 159 कोटी रुपयांची विकासकामे केली जाणार आहेत. पुढील दोन वर्षांतच सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमआरव्हीसीने ठेवले आहे.
मध्य रेल्वेवर सुमारे 425 कोटींची कामे
मध्य रेल्वेवरील कारशेडच्या स्थापत्य व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सुमारे 425 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. कुर्ला कारशेडसाठी 139 कोटी, कळवा कारशेड-138 कोटी व सानपाडा कारशेडसाठी 148 कोटी रुपये खर्च अंदाजित आहे.




























































