
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे याने डॉक्टर आणि नर्सला बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता कल्याण पूर्वेतील भानू ज्योत या खासगी हॉस्पीटलमध्ये डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली. योगेंद्र जैस्वाल (41) असे जखमी डॉक्टरांचे नाव आहे. याप्रकरणी हल्लेखोर विनीत देशमुख (30) याच्याविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विनीत देशमुख याचे वडील जयवंत देशमुख हे कल्याण पूर्वेतील पुना लिंक रोडवरील काटेमानिवली परिसरातील भानू ज्योत रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेले होते. डॉ. जैस्वाल यांनी त्यांना तपासल्यानंतर औषधे लिहून दिली. यावेळी वडिलांच्या आजारासंदर्भात विनीत डॉ. जैस्वाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या केबीनमध्ये गेला. त्यावेळी हा प्रकार घडला.
काय रे तू लैय मोठा डॉक्टर लागून गेलास काय?
विनीत देशमुख डॉ. जैस्वाल यांच्याशी सभ्यतेने बोलण्याऐवजी अरेरावी करत होता. ‘काय रे तू लिहून दिलेली औषधे कशी घ्यायची?अशी विनीतने डॉक्टरांना एकेरीत विचारणा केली. यावर डॉक्टरांनी त्याला मी तुमच्याशी सभ्यतेने बोलत आहे. तुम्हाला मान देऊन अहो जावो करत आहे, आणि तुम्ही मला अरे तुरे करत आहात हे बरोबर आहे का, अशी विचारणा केली. याचा राग येऊन विनीतने डॉ. जैस्वाल यांना काय रे तू लैय मोठा डॉक्टर लागून गेलास काय, असे म्हणत शिवीगाळ करत थेट मारहाण सुरू केली.





























































