वाढवणवासियांवरील अन्याय शिवसेना सहन करणार नाही, केदार दिघे यांनी साधला आंदोलनकर्त्या भूमिपुत्रांशी संवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विनाशकारी वाढवण बंदराविरोधात भूमिपुत्रांनी वरोर येथे सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असून त्यांच्यावरील अन्याय कदापिही सहन केला जाणार नाही, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी दिला. त्यांनी वरोर येथे जाऊन आंदोलनकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या मागण्या व अडचणी समजावून घेतल्या.

प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात वरोर येथे गेल्या काही दिवसांपासून स्थानिकांनी आंदोलन सुरू केले होते. वारंवार आंदोलने करूनही राज्य व केंद्र सरकार येथील मच्छीमारांच्या माथ्यावर हे बंदर लादत असल्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होणार आहे. तसेच स्थानिकांचा रोजगार बुडणार असून भूमिपुत्रांचे अस्तित्वच धोक्यात येईल. त्यामुळे हे बंदर रद्द करावे, अशी मागणी केदार दिघे यांनी केली.

माघार घेणार नाही

वाढवण बंदराविरोधात ग्रामस्थ व मच्छीमार आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका भूमिपुत्रांनी घेतली आहे. आज ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दर्शवत आधार दिला. यावेळी शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख गिरीश राऊत, जिल्हाप्रमुख ओमकार पाटील, विकास मोरे, सुधीर तामोरे, सुभाष म्हास्कर, अभिषेक जाधव, प्रमोद पाटील यांच्यासह महिला आघाडीच्या भावना केणी, नमिता राऊत, अंजली दमसे, भारती सावे, शर्मिला राऊत, संगीता मोरे आदी उपस्थित होते.