
वाडा तालुक्यातील कूंढले ग्रामपंचायत हद्दीतील चंद्रपाडा येथील ओहोळावरील पुलाला तडे गेले आहेत. धोकादायक पुलावरूनच वाहनांची ये-जा सुरू असून दुर्घटनेची भीती आहे. पूल धोकादायक झालेला असतानाही प्रशासन लक्ष देत नसल्याने परिसरातील नागरिक व वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण असून पुलावरून अवजड वाहतुकीस त्वरित बंदी घालण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
१९९० साली निर्माण झालेल्या चंद्रपाडा पुलावर मधोमध मोठे भगदाड पडले असून ठिकठिकाणी तडे गेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग या पुलाच्या दुरुस्ती करण्यास दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. हा पूल वाडा व शहापूर तालुक्यातील १५ ते २० गावांना जोडतो. या पुलावरून दररोज शेकडो नागरिक व वाहने ये-जा करीत आहेत. या पुलाला तडे गेल्याची बाब जागृत नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर वाहनधारक व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला असून या पुलाची तातडीने तांत्रिक तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी उपसरपंच राणी पाटील यांनी केली आहे.






























































